चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुलात कबड्डी खेळाला नवी दिशा देणाऱ्या कबड्डी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील होतकरू कबड्डीपटूंना दर्जेदार प्रशिक्षण, आधुनिक सुविधा आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.
प्रसंगी उद्घाटन सोहळ्यास कबड्डीप्रेमी, क्रीडाप्रेमी, युवक-युवती, कबड्डीपटू, जिल्हा क्रीडा संकुलातील अधिकारी-कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला वैभवशाली खेळ असून नव्या पिढीने या खेळाकडे अधिकाधिक आकर्षित होऊन आपले क्रीडा कौशल्य विकसित करावे, असे आवाहन केले. कबड्डी हा केवळ खेळ नसून शिस्त, संयम, परिश्रम, चपळता आणि संघभावना घडविणारी जीवनशाळा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
तसेच ग्रामीण भागातील सुप्त क्रीडा प्रतिभेला योग्य प्रशिक्षण, आधुनिक सुविधा आणि अनुभवी मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने या प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. उद्घाटन प्रसंगी प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक प्रतीक पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रशिक्षण केंद्रातून भविष्यात राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणारे कबड्डीपटू घडतील, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. जिल्हा क्रीडा संकुलातील या उपक्रमामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा मिळणार असून, युवा खेळाडूंसाठी हे प्रशिक्षण केंद्र प्रेरणादायी ठरणार आहे.


