बोदवड पंचायत समितीमध्ये एसीबीची कारवाई
बोदवड : वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यासाठी 600 रुपयांची लाच घेताना बोदवड पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यक उमेश शामकांत सपकाळे (वय 49) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई गुरुवारी पंचायत समितीच्या कार्यालयात करण्यात आली.
52 वर्षीय तक्रारदार हे वाद्य कलाकार असून त्यांनी शासनाच्या वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेचा लाभ मिळण्यासाठी ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाईन अर्ज केला होता. अर्जाची प्रत त्यांनी पुढील कारवाईसाठी पंचायत समिती बोदवड येथे जमा केली होती. या अर्जावर प्रस्ताव तयार करून तो जिल्हा परिषद जळगाव येथे पाठवण्यासाठी कनिष्ठ सहाय्यक उमेश सपकाळे यांनी सुरुवातीला 3 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार नोंदवली. तक्रारीच्या पडताळणीदरम्यान तडजोडीअंती आरोपीने 600 रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. दि. 30 जुलै रोजी पंचायत समिती कार्यालय, बोदवड येथील सामान्य प्रशासन कक्षाच्या बाहेरील गॅलरीमध्ये 600 रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारताना उमेश सपकाळे याला तातडीने ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही यशस्वी कारवाई नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, आणि अंमलदार बाळू मराठे, राकेश दुसाने व अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.


