हतनूर धरणाजवळील जुगार अड्ड्यावर वरणगाव पोलिसांचा छापा
६ जण ताब्यात, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त
वरणगाव (ता. भुसावळ) : हतनूर धरणाजवळील पाण्याच्या जॅकवेलच्या ओट्यावर अनधिकृतरित्या जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळताच वरणगाव पोलिसांनी तत्काळ कारवाई करत धाड टाकली. या कारवाईत सात जणांपैकी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून, घटनास्थळावरून सुमारे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरणगाव पोलिस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंचांच्या उपस्थितीत जॅकवेल परिसरात अचानक छापा टाकला. पोलिसांना पाहताच काही आरोपींनी झाडाझुडपांतून पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पाठलाग करून सहा आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. एका आरोपीने अंधाराचा फायदा घेत दुचाकीवरून पळ काढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये निखिल धांडे (वय ३२, ), लखन कोळी (वय ३०, रा. ), सागर कोळी (वय २५, रा. ), राजेंद्र वाघ (वय ३५, ), यशवंत सुरवाडे (वय २७, ) आणि सचिन कोळी (वय ३२, ) यांचा समावेश आहे.
घटनास्थळावरून १ लाख ३६ हजार १०० रुपये रोख रक्कम, मोबाईल फोन, मोटारसायकली, पत्त्यांचा कॅट तसेच जुगारासाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले. सुरुवातीला आरोपींनी अंगझडतीस विरोध केला; मात्र पंचासमक्ष सखोल तपासणी केल्यानंतर सर्व मुद्देमालाची नोंद घेण्यात आली.
या कारवाईत काही आरोपी पळून गेल्याची माहिती ताब्यात असलेल्या आरोपींकडून मिळाली असून, त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके कार्यरत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी, पोलीस कर्मचारी यासिन पिंजारी, प्रशांत ठाकूर, मनोज म्हस्के, ईश्वर तायडे, भूषण माळी आणि गोपीचंद सोनवणे यांनी ही कारवाई यशस्वी केली.