विकृत लोकांच्या बुरसटलेल्या विचारांना छेद देणारा ‘झुंड’

0

गौरव हरताळे, लोकशाही न्यूज नेटवर्क

नागराज मंजुळेंचा झुंड ४ मार्चला सर्व सिनेमा घरात प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाची आतुरता नागराज मंजुळे यांच्या रसिक प्रेक्षकांना होतीच. पण या चित्रपटाच्या पहिल्या दिवसापासून सोशल मीडियावर चित्रपटासंदर्भात मतमतांतरे होतांना आपल्याला दिसत आहेत. ही मतमतांतरे हा विरोध आपण बाजूला सारून या चित्रपटाला स्वीकारले पाहिजे. कारण आपण या भारताचे नागरिक म्हणून आपल्याला देशातील शोषित पीडितांचे अस्तित्व कधीच नाकारु शकत नाही.

नागराज मंजुळे यांनी नेहमीप्रमाणे या चित्रपटातून समाज प्रबोधनाचे, समाजातील वास्तव दाखवण्याचे काम केलेले आपल्याला दिसते. आणि या प्रबोधनाच्या कार्यात त्यांनी अमिताभ बच्चन यांना सामील करून घेतले. व अमिताभ बच्चन यांनी या भूमिकेसाठी होकार दिला. ही खरी कौतुकाची बाब म्हणावी लागेल. त्याचबरोबर मंजुळेंचं दिग्दर्शन आणि अजय अतुल यांच संगीत याला तर तोड नाही.

या चित्रपटातील एक अन एक मुद्दा आपल्या मानवी संवेदना जागृत करणारा आहे. जसे अमिताभ बच्चन त्या झोपडपट्टीत अडकतात आणि त्यांनी पाहिलेला ते दृश्य तेथील मुलं एका प्लॅस्टिकच्या डब्याच्या साहाय्याने फुटबॉल खेळत असतात. ही खरी गरीब प्रलंबित समाजाची वस्तुस्थिती दर्शवणारा तो सिन, कुठल्याही छोट्यात छोट्या गोष्टीत समाधान मानून त्यातून काही नवी निर्मिती करणे. किंवा बँजोचा सामान नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा दोन चार प्लास्टिक पत्र्याचे डब्बे घेऊन तयार केलेली धून. ह्या गोष्टी छोट्या छोट्या का असेनात पण खरंच लक्षात घेण्यासारख्या आहेत.

त्याचबरोबर या चित्रपटातील सर्वात मोठी क्रांती म्हणजे बिग स्क्रीनवर दाखवण्यात आलेली भिम जयंती, जे आजतोवर कुठलाही निर्माता करू शकला नाही ते मंजुळे यांनी केले. खरं तर भिम जयंती खूप वर्षांपासून साजरी केली जाते. अगदी भिम जयंती बैल गाडीवर वाजत गाजत निघायची तर आजपर्यंत, अशा या वर्षानुवर्षे चालत आलेल्या सणाबद्दल दिसत तर सर्वांना होते पण कोणी त्याला प्रदर्शित करण्याची हिम्मत दाखवली नाही.

ज्या माणसाने खऱ्या अर्थाने समाजातील वंचित घटकांना पुढे आणण्याचं काम केल. अशा माणसाला आपण दुर्लक्षित करू शकत नाही. ही गोष्ट समाजातील स्वतःला उच्चभ्रू म्हणवून घेणाऱ्या लोकांनी लक्षात घ्यावयाला पाहिजे. चित्रपटातील जयंतीचा एक महत्वाचा सिन ज्यात मिरवणूक चालू असताना, रुग्णवाहिका येते. व तेथील लोकांच्या लक्षात येताच लगेच त्या रुग्णवाहिकेसाठी वाट मोकळी करून देण्यात येते. पण काही लोकांना वाटते कि, हे लोक रस्त्यावर येऊन दंगा घालतात, धिंगाणा करतात. त्यांना एवढाच सांगणं आहे. ह्या लोकांजवळ डान्स पबमध्ये जायला पैसे नसतात. त्यांच्यासाठी हा रास्ता त्यांचं घर सर्व काही असत. आणि चित्रपटातील गाण्यात म्हटल्याप्रमाणे “लेना देना अपना क्या है तडक भडक बंगलो से अपना तो सडक आशियाना है” याप्रमाणे रस्त्यांना सजवून आपली मिरवणूक काढत असतात.

या चित्रपटातील अजून एक अति महत्वाचा प्रसंग. ज्यात अमिताभ बच्चन मुलांना त्यांच्या जीवनाबद्दल विचारतात. तेव्हा प्रत्येकाने मांडलेली आपली कथा, माणूस म्हणून आपल्याला विचार करायला लावणारी आहे. जेव्हा त्या वयाची मुलं आपल शिक्षण, करियर, भविष्य या सगळ्यांचा विचार करतात त्याच वयाचा चित्रपटातील बाबू नावाचा पात्र खून करून तुरुंगात जावून आला की आपला दबदबा संपूर्ण वाड्यात होईल, असे विचार करीत आहे. त्याचे असे विचार कसे निर्माण झाले. तो त्या वाईट प्रवृत्तीकडे कसा आकर्षिला गेला. हा खरा विचार करण्याचा भाग आहे.

अशा या सर्व मुलांना सोबत घेऊन झुंडची टीम बनवायची आणि त्याच्या विविध कलांना योग्य वळण देऊन त्यांना एका चांगल्या जीवनाची वाट दाखवायची. हा विचार जर आपण सर्वानी केला तर खरंच कोणीही वाईट प्रवृत्तीकडे वळणार नाही. कोणीही जन्माने वाईट नसतो. त्याच्या जीवनात घडलेल्या काही वाईट प्रसंगामुळे तो त्या सर्व गोष्टींना छेद देण्यासाठी चुकीच्या मार्गांचा अवलंब करीत असतो. पण आपण त्यांना एक संधी देऊन त्यांचे जीवन सुधरवण्यासाठी काम केलं पाहिजे. यामुळे आपल्या समाजात निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या दऱ्या नष्ट होऊ शकतात.

हा चित्रपट आपल्याला दोन वेगवेगळ्या भारताचे दर्शन घडवतो. आपण या शोषित वंचित समाजाबद्दल काय विचार करत आलो आहोत आणि आजही आपण तीच बुरसटलेली विचारसरणी ह्या शोषित वंचित लोकांबद्दल बाळगत आहोत. ते असे का वागतात, वाईट कृत्य का करतात याचा आजही आपण विचार करत नाही, पण आपण ह्या सगळ्यांचा विचार करायला पाहिजे. त्यांना एक संधी उपलब्ध करून दिली पाहिजे, जेणेकरून ते देखील स्वतःला सिद्ध करू शकतील. आपल्यात असलेली प्रतिभा समाजासमोर मांडू शकतील.

आणि ज्याप्रमाणे चित्रपटाचा शेवट ते विमान उडाल्याने होतो. त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा आपल्या विचारांना उंच घेऊन जावं लागेल व त्या शेवटच्या सिनमध्ये भिंतीवर लिहलेल्या वाक्याप्रमाणे आपल्याला जात, धर्म, रंग, लिंग, गरीब, श्रीमंत या आपल्या बुद्धीत बनवलेल्या भिंतीला तोडून खऱ्या अर्थाने आपल्या बुद्धीचा विकास करावा लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.