यावल शहर

यावल तालुक्यातील मोहराळा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जामूनझिरा पाड्यावर गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी न लागल्याने संतप्त ग्रामस्थांनी थेट यावल पंचायत समिती गाठत प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
यावेळी ग्रामस्थांनी पंचायत समितीचे अधीक्षक ज्ञानेश्वर निळे आणि इसरास खान यांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, जामूनझिरा पाड्यावर मागील दोन ते तीन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई असून, या संदर्भात ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा तोंडी तक्रारी करण्यात आल्या. मात्र, अद्याप कोणतीही प्रभावी कार्यवाही झालेली नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधेअभावी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, विशेषतः आदिवासी बांधवांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे. वेळेत योग्य उपाययोजना करण्यात आली असती, तर ही परिस्थिती उद्भवली नसती, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत, तातडीने नियमित पाणीपुरवठा सुरू न झाल्यास यावल पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून दिला आहे.
या निवेदनावर प्यारसिंग बारेला, प्रेमसिंग बारेला, बिलरसिंग पावरा, रमा पावरा, मोहन पावरा, गजिराम पावरा, प्रकाश बारेला, हरसिंग बारेला, सबसिंग बारेला, हितेश बारेला, देवसिंग बारेला आणि सुनिल बारेला यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, आदिवासी पाड्यावर पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना आंदोलनाचा इशारा द्यावा लागत असल्याने ग्रामीण पाणीपुरवठा व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रशासनाने तातडीने या प्रश्नाची दखल घेऊन जामूनझिरा पाड्यावरील पाणीटंचाई दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


