
लोकशाही संपादकीय लेख
गेल्या पंधरा दिवसांपासून जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांवर या कुत्र्यांनी हल्ला चढवला. त्यामध्ये डॉक्टर सुद्धा सुटलेले नाहीत. एका लहान बालकावर या कुत्र्यांनी हल्ला करून त्याचे लचके तोडले. त्यात त्या लहान बालकाचा मृत्यू झाला. नागरिकांची ओरड चालू असताना महापालिकेने मात्र सपशेल दुर्लक्ष केले. वास्तविक शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महापालिकेची असताना महापालिकेला जणू त्याचे सोयरे सुतक नव्हते. शेवटी नागरिकांनी या मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला तेव्हा कुठे आमच्या महानगर पालिकेला जाग आली आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हालचाल सुरू झाली . कुत्रा चावल्यानंतर जे अँटी रेबीजचे इंजेक्शन द्यावे लागते त्याचे एकमेव केंद्र फक्त सिविल हॉस्पिटलमध्ये होते. त्यामुळे नागरिकांची या केंद्रावर अँटी रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी गैरसोय होऊ लागली. नागरिकांच्या मागणीनंतर जळगाव शहरात अन्य तीन ठिकाणी अँटी रेबीज इंजेक्शन देण्याचे केंद्र सुरू केले.
वेळीच महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला असता, तर आज अनेकांना जो कुत्र्यांनी चावा घेतला त्यातून ते बचावले असते. महापालिकेच्या प्रत्येक डिपार्टमेंट कडून नियमित कामे केली गेली तर असे अनिष्ट प्रकार उद्भवणारच नाहीत. आरोग्य विभागाच्या वतीने लोकांच्या आरोग्याशी निगडित कामे केली तर असे प्रसंगच आले नसते. घोड्या मागून वरात म्हणतात तशातला हा प्रकार जळगाव महानगरपालिका प्रशासनाचा आहे. त्यांच्या मनमानी कारभाराला लगाम घातला गेला पाहिजे. सरकारला मनमारी कारभार करता येणार नाही, असे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती बी आर गवई यांनी सज्जड दंड दम दिला आहे. महापालिका आयुक्तांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे. परंतु जळगाव महानगरपालिका आयुक्तांना तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्याचे काहीही घेणे देणे नाही.
जळगाव शहरातील खोटे नगर ते कालिंका माता मंदिर या दोन्ही बाजूला अतिक्रमणामुळे समांतर रस्ते करता येत नाही. समांतर रस्ते नसल्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन दररोज अपघात होऊ लागले आहेत. यात अनेकांचे बळी देखील जात आहेत. किड्या मुंग्यांसारखे अपघातात लोक चिरडले जात आहेत. परंतु महानगरपालिकेला दोन्ही बाजूला असलेली अतिक्रमणे काढणे शक्य होत नाही. अपघात होतात, लोक मारतात, आम्हाला त्याचे काही घेणेदेणे नाही अश्या पद्धतीने महापालिका प्रशासन वागते आहे. जळगाव शहरातील रस्त्यांच्या बाबतीतही हेच चालले आहे. कुणी वंदा अथवा निंदा आमचा काम न करण्याचा एकच धंदा, अशा प्रकारचे महापालिकेचे कारभार चालू आहेत. निवडणुका तोंडावर आल्या असताना लोकप्रतिनिधींना त्याचे काहीही वाटत नाही. पैशाच्या जोरावर सर्व काही करू शकतो, या थाटात सत्ताधारी लोकप्रतिनिधी आहेत. परंतु जनतेचा खरा झटका बसला की हे मंडळी तेव्हा रडत बसतील.
जळगाव शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न महापालिका प्रशासनाला किरकोळ वाटत असला तरी ज्यांच्यावर तो बेतला आहे, त्यांनाच त्याची जाणीव आणि झळ काय असते हे कळेल. एसी केबिनमध्ये बसून प्रशासकीय कागदी घोडे नातविणाऱ्यांना त्याबाबत काहीही कळणार नाही. जळगाव शहरातील रस्त्यांवरून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी टू व्हीलर चालवून दाखवावी, असे आव्हानच नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी काम न करता कसलेही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. जळगाव शहरवासीयांना चांगल्या नागरिक सुविधा पुरवण्याची महापालिकेकडून अपेक्षा असताना एकाही नागरिक सुविधा धड व्यवस्थित पुरवली जात नाही. अमृत पाणीपुरवठा योजना अमलात आल्यानंतर दररोज पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. दररोज तर सोडाच दोन दिवसाआड सुद्धा नियमित पाणीपुरवठा केला जात नाही, हे खेदाने म्हणावे लागते.
संपूर्ण जळगाव शहरात नवीन अमृत पाणी पाण्यासाठी नवीन पाईपलाईन टाकली गेली आहे. परंतु चार महिन्यातच व्हॉल्व खराब झाला म्हणून पाणीपुरवठा पुढे ढकलण्यात आला. व्हॉल्व नादुरुस्त होण्यामागचे कारण काय तर लोकांनी आरोप केला नवीन व्हॉल्व म्हणून जुनाच वॉल वापरला. त्याचे हे परिणाम होते. असे असेल तर त्याला काय म्हणावे? अमृत योजना पाणी फोर्सने सोडले जाईल, अगदी दुसऱ्या मजल्यावर सुद्धा मोटारी शिवाय पाणी जाईल असे सांगण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात पहिल्या मजल्यासाठी मोटारी लावण्याची गरज पडत आहे. ही बाब निषेधार्ह आहे.
या सर्व बाबींकडे महापालिकेत कुणाचा पायपोस कुणाजवळ नाही. जळगावकर नागरिकांचे प्रश्न वाऱ्यावर सोडून दिले जात आहेत. ज्या अमृत पाणीपुरवठा योजनेवर करोडो रुपये खर्च करण्यात आले, दहा वर्षे झाले त्याचे काम चालले. परंतु शेवटी हाती काय? धतुरा..! असे म्हणण्याची वेळ आली आहे. म्हणून मोकाट कुत्रे असो, वाढते अतिक्रमण असो, अमृत योजनेचे पाणी असो, वाढते अपघात असो, त्याचे महापालिका प्रशासनाला काही घेणेदेणे हे स्पष्ट दिसून येते…!

