जळगाव शहरात ७५९ नवीन एलईडी पथदिवे, झगमगाट वाढणार !
अजिंठा चौफुली ते विमानतळापर्यंत ६०० एलईडी दिवे

जळगाव – शहरात अजिंठा चौफुलीपासून विमानतळापर्यंत आणि सर्व १९ प्रभागांमध्ये तब्बल ७५९ एलईडी पथदिवे बसवले जाणार आहेत. त्यामुळे शहरात रात्रीचा झगमगाट वाढणार आहे. या प्रकल्पासाठी शासन आणि डीपीडीसीच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आला आहे.
शहरातील १५ प्रभागांत १५९ नवीन पथदिवे
शहरातील १५ प्रभागांसाठी १५९ नवीन विद्युत खांब (६ मीटर उंचीचे) आणि एलईडी पथदिवे बसविण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला होता. आ. राजूमामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा प्रकल्प राबवला जात आहे.
या प्रकल्पाअंतर्गत अजिंठा चौफुलीपासून ते विमानतळापर्यंत ३०० विद्युत खांब (९ मीटर उंचीचे) बसवले जाणार आहेत. या खांबांवर दोन्ही बाजूंनी एलईडी पथदिवे बसवले जातील. यासाठी प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे, आणि लवकरच त्याला प्रशासकीय मान्यता मिळेल.
महापालिकेने ईएसएल कंपनीच्या माध्यमातून १६,००० हून अधिक पथदिवे बसवले होते. मात्र, ईएसएल कंपनीने काम बंद केल्यामुळे अनेक भागात पथदिवे बंद पडले आहेत. मनुष्यबळाची कमतरता असल्याने महापालिकेला देखभाल-दुरुस्ती करण्यात अडचणी येत आहेत.
नवीन पथदिव्यांमुळे प्रकाशमान शहर
या नव्या प्रकल्पामुळे शहरातील अनेक अंधारमय भाग उजळतील, नागरिकांचा सुरक्षिततेचा प्रश्न सुटेल, आणि रस्ते प्रकाशमान होतील. विशेषतः अजिंठा रस्ता आणि शहरातील प्रभागांमध्ये एलईडी पथदिव्यांचा झगमगाट दिसणार आहे.


