जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क
जळगाव शहरातील जिल्हा परिषदमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ लिपिकाला एक लाख ८० हजाराची लाच घेताना बुधवारी (दि.२१) ‘लाचलुचपत’ने रंगेहाथ अटक केली. नरेंद्र किशोर खाचणे (वय ५२) असे या लिपिकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , यातील तक्रारदार सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्र यावल येथे शिपाई पदावर कार्यरत होते. त्यांची रावेर पंचायत समिती येथे अभियांत्रिकी सहाय्यक पदावर बदली झाली. लिपिकाने तक्रारदार यांच्याकडे बदलीच्या कामाबद्दल २ लाखाची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २१ ऑगस्टला तक्रार दिली. त्यानंतर लाचलुचपतने लाचप्रकरणी पडताळणी केली.
यादरम्यान वरिष्ठ लिपिक नरेंद्र खाचणे यांने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तडजोडअंती १ लाख ८० हजार द्यायचे ठरले. ही रक्कम स्विकारताना लाचलुचपतने सापळा रचून खाचणे याला अटक केली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई लाचलुचपतचे विभागाचे पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, पीएसआय दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, सुनिल वानखेडे, राकेश दुसाणे, प्रणेश ठाकुर, सुरेश पाटील, रविंद्र घुगे, सचिन चाटे, अमोल सूर्यवंशी केली. त्याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.