जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पश्चिमी झंझावाताचा परिणाम आणखी वाढल्यामुळे सबंध भारतामध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. काश्मीरच्या खोऱ्यापासून हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या पर्वतीय क्षेत्रांमध्येही तापमानात घट झाली असून, उत्तर भारतातील मैदानी क्षेत्रासह देशाच्या उर्वरित राज्यांच्या दिशेनं या शीतलहरी अधिक वेगाने वाहत येत असल्यामुळे गारठा अधिक जाणवू लागला आहे. जळगाव जिल्ह्यातही थंडीने वेढा दिला असून आगामी काही काळ थंडी कायम राहणार असून यामुळे गहू, हरभरा, दादर या पिकांना फायदा होणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर असणारे पावसाचे सावट आता जवळपास नाहीसे झाले असून, मुंबईतही थंडीने पकड मजबूत केल्याचे पाहायला मिळत आहे. मागील दहा वर्षांमध्ये मुंबईतील थंडीने न मोडलेले सर्व विक्रम मोडीस निघाले. जळगाव जिल्ह्यातही थंडी चांगल्या प्रमाणात पडत असून शहरातील किमान तापमानाचा आकडा 13.7 अंशांवर पोहोचला आहे. ‘फेंगल’ चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर मुंबईसह राज्याच्या किनारपट्टी क्षेत्रामध्ये थंडीसाठी पूरक वातावरण निर्मिती होताना दिसत असून, पुढील काही दिवस हीच स्थिती कायम असणार आहे.
धुळ्यातील जनजीवन विस्कळीत
राज्यात धुळे शहरात 4c निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हे यंदाच्या हंगामात सर्वाधिक कमी तापमान ठरले असून, वाढत्या थंडीमुळे येथील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. उत्तर महाराष्ट्रामध्येही तापमान 10 अंशांहून कमी झाले असून, या किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढतच असून, त्याचा परिणाम उर्वरित देशात पाहायला मिळत आहे.