लोकशाही संपादकीय लेख
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका प्रक्रियेचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. जळगाव जिल्ह्यातील एकूण ११ विधानसभा जागांपैकी जिल्ह्यातील तीन कॅबिनेट मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपचे संकट मोचक असलेले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन जामनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या विरोधात त्यांचेच आतापर्यंतचे खंदे समर्थक असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे हे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवीत आहेत. अगदी सरळ सरळ गिरीश महाजन आणि दिलीप खोडपे यांच्यात होणारी ही निवडणूक मंत्री गिरीश महाजन यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची आहे. जामनेर मधून गिरीश महाजन यांना दिलीप खोडपे यांच्या रूपाने एक आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. दुसरे कॅबिनेट मंत्री जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटातर्फे निवडणूक लढवीत आहेत. त्यांचे विरोधात जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणुकीला उभे असून या दोन आजी-माजी पालकमंत्र्यांच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात दोघांचा प्रचार शिगेला पोहोचला असून महायुतीतील घटक पक्ष भाजपतर्फे युती धर्म पाळला जात नसल्यांची खंत व्यक्त केली जात आहे. तर गुलाबराव देवकरांना महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादीसह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसकडून प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहेत.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गेल्या पाच वर्षाच्या काळात मतदारसंघात केलेल्या विकास कामांमुळे मतदार संघात मतदारांकडून प्रतिसाद मिळतो आहे. मतदारसंघात विविध ठिकाणी मतदारांकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे. जिल्ह्यातील तिसरे कॅबिनेट मंत्री मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील हे अमळनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. अनिल भाईदास पाटील हे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवत असून या मतदारसंघात महाविकास आघाडीतील काँग्रेसतर्फे डॉक्टर अनिल शिंदे हे निवडणूक लढवीत आहेत. या मतदारसंघात माजी आमदार शिरीष चौधरी हे भाजपशी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवीत असल्याने या मतदारसंघात होणाऱ्या तिरंगी सामन्यात कोण बाजी मारतो? याकडे लक्ष लागले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिरीष चौधरी हे अपक्ष निवडणूक लढवून विजयी झाले होते. त्यानंतर ते भाजपचे सहयोगी सदस्य बनले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिरीष चौधरी यांनी भाजपतर्फे निवडणूक लढवली. तथापि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भाईदास पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता. २०२४ च्या निवडणुकीत महायुतीतर्फे ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्यामुळे शिरीष चौधरी हे भाजपशी बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत. अपक्ष उमेदवार माजी आमदार शिरीष चौधरी हे २०१४ च्या विधानसभेची पुनरावृत्ती करू शकतात का? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अनिल शिंदे हे पहिल्यांदाच आपले नशीब आजमावत असल्याने तिरंगी सामन्यात कोण बाजी मारतो हे पाहण्याची उत्सुकता आहे. एकंदरीत जिल्ह्यात तीन कॅबिनेट मंत्र्यांची निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे गेल्या ३० वर्षापासून जामनेर मतदार संघात निवडून येत आहेत. २०१४ च्या पूर्वी ते विरोधी पक्षात होते. २०१४ ते २०१९ या काळात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जलसंपदा मंत्री म्हणून कार्यरत होते. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते विश्वासू सहकारी असल्याने जिल्ह्यात व मतदार संघात त्यांनी विकास कामे आणण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जळगाव लगत उभे राहत असलेले ‘मेडिकल हब’ हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. एकाच परिसरात वैद्यकीय शास्त्राच्या सर्व पॅथींचे शिक्षण देण्याची सोय या ‘मेडिकल हब’ मधून मिळणार आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारचे सर्व वैद्यकीय पॅथींचे शिक्षण देणारे हे ‘मेडिकल हब’ जळगाव मध्ये असेल, हे विशेष होय.. त्यामुळे वैद्यकीय सेवेसाठी जळगाव महाराष्ट्रात लक्ष वेधून घेणार हे निश्चित आहे. जामनेर विधानसभा मतदारसंघात गेल्या ३० वर्षात विकासाची कामे केली असल्याने ही ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे ही निवडणुक त्यांच्यासाठी राजकीय दृष्ट्या अटीतटीची करण्यात आली असली तरी ते निवडणूक जिंकून येतील, असे चित्र दिसते आहे.
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्यात सामना रंगतो आहे. गेल्या पाच वर्षात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मतदार संघात केलेल्या विकास कामाच्या जोरावर ‘आपण ही निवडणूक जिंकूच’ असा आत्मविश्वास त्यांना आहे. तथापि माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर म्हणतात, ‘माझ्या पालकमंत्री पदाच्या कारकिर्दीत जी विकासाची कामे झाली, उदाहरणार्थ. धरणगावात रेल्वे उड्डाणपूल, असोद्याचे बहिणाबाई चौधरी स्मारक, जळगावची संभाजी राजे नाट्यगृह, तसेच तालुका क्रीडा संकुल आदी विकास कामे माझी जमेची बाजू असल्याने प्रचारात त्यामुळे मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.’ असे त्यांचे म्हणणे आहे. अमळनेर विधानसभा मतदारसंघात मदत व पुनर्वसन मंत्री महायुतीचे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवीत आहेत. अमळनेर तालुक्याची तसेच जिल्ह्याची लाईफ लाईन असलेल्या निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाचे गेल्या पंचवीस वर्षापासून भिजत घोंगडे पडले आहे. तथापि निधी अभावी रखडलेल्या प्रकल्पाचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून मार्गी लावण्याचे काम मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी गेल्या अडीच वर्षाच्या आपल्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात केले असल्याने त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत मिळतो का? हे महत्त्वाचे आहे. महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अनिल शिंदे आणि अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी हे त्यांना कशी टक्कर देतात यावर मंत्री अनिल भाईदास पाटील यांचे भवितव्य अवलंबून आहे…!