सहा पक्षांच्या बाराभानगडीत कोण मारणार बाजी ?
बंडखोरीच्या धास्तीने श्रेष्ठीही घामेघाम : युती-आघाडीत रंगणार सामना
लोकशाही विशेष (दीपक कुलकर्णी)
विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून सर्वच पक्षांची लगीनघाई सुरु झालेली आहे. जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेनेचे वर्चस्व असून महायुतीच्या माध्यमातून जिल्ह्यात तीन कॅबिनेट मंत्री आहे. पूर्वीपासून जळगाव जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला राहिला असून दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपाचे खासदार असून रक्षा खडसे यांना केंद्रात राज्यमंत्री पदही मिळाले आहे.
सहा पक्षांच्या बाराभानगडीत कोण बाजी मारणार हे आगामी काळात स्पष्ट होणार असले तरी आतापासूनच सामना रंगण्यास सुरुवात झाली आहे. बऱ्याच पक्षांमध्ये बंडखोरीची लागण होणार असून श्रेष्ठीही कार्यकर्त्यांना समजाविण्यात घामेघाम झालेले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर त्याचा फायदा भाजपाने घेतला असून अनेकांना प्रवेशही दिला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाची येथे ताकद असली तरी स्थानिक नेतृत्व मात्र दमदार नसल्याने राष्ट्रवादीची वाट बिकट आहे.
काँग्रेसला तर अंतर्गत गटबाजीने ग्रासले आहे. शिवसेना (उबाठा) गटाची ताकद काही मर्यादीत मतदारसंघात आहे. जिल्ह्याचे नेते गुलाबराव पाटील हे शिंदेंच्या सोबत गेल्याने उबाठा गटाला मोठे भगदाड पडले. चार आमदार असलेल्या उबाठाकडे आजमितीस केवळ सैनिकांची फौज आहे. एकंदरीत जिल्ह्यात महायुती विरुद्ध आघाडी असा सामना होणार असला तरी त्यात काही धक्कादायक निकालही हाती येवू शकतो.