जळगाव बिनविरोध उमेदवार निवडी मागचा अन्वयार्थ..!

0

 

लोकशाही संपादकीय लेख 

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जळगाव मनपा मध्ये एकूण 75 जागांपैकी 12 उमेदवार यांचे समोर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने त्यांची बिनविरोध निवड होणार आहे. आता 75 पैकी 63 जागा जागांसाठी निवडणूक होणार आहे. बिनविरोध झालेल्या 12 उमेदवारांमध्ये सत्ताधारी महायुतीच्या भाजपाचे 6 तर शिवसेना शिंदे गटाचे 6 उमेदवारांचा समावेश आहे. 12 उमेदवारांपैकी भाजपच्या उमेदवार उज्वला बेंडाळे या प्रभाग क्रमांक 12 अ मधून तांत्रिकदृष्ट्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे बिनविरोध निवडून आल्या. तथापि इतर 11 उमेदवार जे बिनविरोध निवडून येणार आहेत, त्या सर्व उमेदवारांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज मागे घेतले की त्यांच्यावर दबाव आणून त्या प्रतिस्पर्धींचे अर्ज मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणून ते मागे घ्यायला लावले? याचा अर्थ अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांनी राजे खुशीने उमेदवारी अर्ज मागे घेतले की त्यांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडले? हा संशोधनाचा विषय म्हणता येणार नाही. सर्वसामान्य नागरिकांना अथवा शेंबड्या पोरालाही जरी विचारले तरी त्याचे उत्तर काय काय मिळेल? याची सर्वांना कल्पना आहे.

तथापि सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असे म्हणतात. त्याचप्रमाणे माघार घेणाऱ्या उमेदवाराने ‘माझ्यावर कसलाही दबाव आला नाही, परंतु मी निवडनुकीतून महाग माघार घेतली’ असे माघार घेणारे सर्वच उमेदवार म्हणतील हेही नाकारता येणार नाही. माघार घेणारा कुठलाही उमेदवार ‘माझ्यावर दबाव आला किंवा मला पैसे मिळाले म्हणून मी माघार घेत आहे’, असे म्हणणारच नाही. कारण माघार घ्यायची होती तर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल का केले? निवडणूक लढविण्याची या माघार घेणाऱ्या उमेदवारांकडून समाजसेवा करायची इच्छा होती की नव्हती? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. उमेदवारी अर्ज दाखल करायचे आणि आपले आर्थिक हित साध्य झाले की माघार घ्यायची, अशातला तर हा प्रकार नाही ना? या प्रश्नाचे उत्तर या माघार घेणाऱ्या उमेदवारांकडून मिळेल का? लोकशाहीमध्ये जर असा प्रकार होत असेल तर लोकशाही धोक्यात येणार नाही का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

जळगाव मनपा निवडणुकीत जे 12 उमेदवार बिनविरोध निवडून येणार आहेत. ते सर्व महायुतीतील सत्ताधारी पक्षाचे आहेत, हे विशेष होय. विरोधी पक्षातील एकही उमेदवार बिनविरोध निवडून का आला नाही? याचे विश्लेषण होणे गरजेचे आहे. बिनविरोध निवड झालेले बारा उमेदवारांची समाजसेवा अथवा महापालिकेतील त्यांचे वर्चस्व असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली का? असे म्हणावे तर यामध्ये काही उमेदवार पहिल्यांदाच महापालिका निवडणूक लढवीत आहेत. डॉक्टर गौरव चंद्रकांत भोळे, विशाल भोळे, सागर शामकांत सोनवणे हे पहिल्यांदा महापालिका निवडणुकीत नगरसेवक पदासाठी उभे राहिले आणि ते बिनविरोध निवडून आले. याचा अर्थ त्यांना राजकीय वारसा होता म्हणून ते बिनविरोध निवडून आले असे म्हणावे का? मित्रहो महापालिका निवडणूक अथवा कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक अथवा आमदार खासदारकीची निवडणूक असो त्या निवडणुका सध्या कशा पद्धतीने होतात हे नव्याने जास्त सांगण्याची गरज नाही. विरोधी पक्षच संपवून टाकायचा ही सत्तेच्या राजकारणाची रणनीती असल्याचे स्पष्ट दिसून येते आणि तेच लोकशाहीला घातक आहे.

यापूर्वी लोकसभा विधानसभेमध्ये अभ्यासू आणि जनतेची खऱ्या अर्थाने सेवा करणारे उमेदवार निवडून यायचे. आपल्या अभ्यासू पणाने सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडायचे. न्यायमूर्ती पै हे लोकसभेतील एक अभ्यासू नेते होते. त्यांचे विरोधात लोकसभेसाठीच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा उमेदवार दिला जात नव्हता. ते बिनविरोध लोकसभेत निवडून यायचे. असे जागरूक अभ्यासू समाजाची सेवा करणाऱ्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली तर ते समाजासाठी आवश्यक होते. परंतु सत्तेच्या दबाव तंत्राने अथवा अर्थ प्रलोभनाने जर उमेदवाराची बिनविरोध निवड होणार असेल तर त्यात व्यक्तिगत स्वार्थ असतो हे विस्तृतपणे सांगण्याची गरज आहे, असे वाटत नाही. त्यासाठी प्रतिस्पर्धी माघार घेणारे उमेदवार सुद्धा तितकेच जबाबदार आहेत, हे मान्य करावे लागेल. त्यामुळे जळगाव महानगरपालिकेत या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व राहील हे स्पष्ट जाणवते आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.