जळगाव,लोकशाही न्यूज नेटवर्क
हौदामधील पाण्यात झोपून अभियांत्रिकीचे शिक्षण झालेल्या तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावातील कानळदा येथे घडली आहे. प्रियंका रवींद्र भंगाळे (३१, रा. कानळदा, ता. जळगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका हिचे अभियांत्रिकीचे शिक्षण झाले असून ती मध्यंतरी पुणे येथे नोकरी करत होती. दोन वर्षांपूर्वी ती गावी परतली व आई-वडिलांसोबत राहत होती. शनिवारी सकाळी घराच्या मागे गुरांच्या गोठ्याजवळ असलेल्या पाण्याच्या हौदात असलेल्या पाण्यात झोपून तिने आत्महत्या केली.
दरम्यान तिचे काका गोठ्याकडे गेले असता सदर तरुणी पाण्यात बुडलेली दिसली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. पोलिस पाटील नारायण पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोहेकॉ अनिल फेगडे, संजय भालेराव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.