लालपरी असुरक्षित, प्रथमोपचार पेटीपासून वंचित..

0

रजनीकांत पाटील, जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

‘एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’ असे ब्रीद घेऊन शहरापासून गाव खेड्यापर्यंत धावणारी राज्य परिवहन महामंडळाची लालपरी खऱ्या अर्थाने लोकवाहिनी ठरली. मात्र सोयीसुविधांच्या अभावामुळे आता लालपरीतील प्रवास असुरक्षित ठरू लागला आहे. महामंडळाच्या बसमध्ये असलेली प्रथमोपचार पेट्या या रिकाम्या आहेत. याकडे महामंडळाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र जळगाव बस स्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये पाहणी केल्यानंतर दिसून आले.

बसची पासिंग करतांना बसमध्ये औषधी व पेटी ठेवलेली असते. त्याशिवाय प्रादेशिक परिवहन विभाग बसचे पासिंग करीत नाहीत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बसने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. यासाठी वेगवेगळ्या सुविधा महामंडळ पुरवीत असते.  एसटी बस लाईनवर असताना दुर्दैवाने दुर्घटना घडल्यास प्रवाशांना प्रथम उपचार करता यावेत, यासाठी बसमध्ये तशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.  तरी उपचार पेटीत आवश्यक असलेल्या औषधी असणे गरजेचे आहे.

प्रत्यक्षात जवळपास 90 टक्के बसमध्ये प्रथमोपचार पेटी दिसत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. बस पासिंग करताना बसमध्ये प्रवाशांसाठी ही सुविधा असणे अनिर्वार्य आहे.  त्यामुळे आरटीओ कार्यालयात  बस नेण्यापूर्वी बसमध्ये सर्व साहित्य उपलब्ध असते. मात्र काही दिवसांतच साहित्य गायब होत  असल्याचे चित्र पहायला मिळते. तर उपचार पेटीत असलेल्या औषधी मुदतीनंतर बदलविणे आवश्यक आहे.

मात्र पेट्यात नसलेल्या औषधी बदलण्याची वेळ येत नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्यातील अनेक बसमध्ये असलेल्या पेट्याच  गायब झाल्याचे चित्र दिसून येत आहे. मुक्कामी जाणाऱ्या बसमध्ये साहित्याचा अभाव असल्याची ओरड वाहकांची आहे. दुर्दैवाने अपघात झाल्यास अशा स्थितीत प्रवाशांना इजा झाल्यास त्यांचा करण्याची कोणतीही सोय बसमध्ये नसल्याचे दिसत आहे. यामुळे महामंडळाने या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.