श्श्श्श…कोई है ! जळगावच्या शिवसेना कार्यालयात भूत ?
भितीपोटी कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ, गुलाबराव पाटलांचा खुलासा
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
“भूत” हा शब्द जरी निघाला तरी अंगाचा थरकाप होतो.. याबाबत अनेक वाद-विवाद, श्रद्धा अंधश्रद्धा, काही स्थानिक मान्यता असल्या तरी भूताला सगळेच घाबरतात. असाच प्रकार जळगावमध्ये घडला आहे. जळगावमध्ये शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय नव्याने उभारण्यात येत असून या कार्यालयात भूत असल्याची अफवा पसरली आहे. या भुताच्या भितीने कार्यकर्त्यांनीही कार्यालयाकडे पाठ फिरवली आहे. याप्रकरणी आता थेट पाणीपुरवठा व स्वछता मंत्री गुलाबराव पाटलांनीच भाषणातून खुलासा केलाय.
नेमकं प्रकरण काय ?
जळगाव शहरातील पांडे चौक परिसरात एक इमारत असून या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यालय नव्याने उभारले जात आहे. मात्र या कार्यालयात भूत असल्याच्या चर्चेमुळे हे कार्यालय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पूर्वीपासून या इमारतीला भूत बंगला असे देखील म्हटले जाते. याबाबत सदर परिसरातील स्थानिक नागरिक अनेक किस्से रंगवून सांगतात. हा जरी अंधश्रद्धेचा असला तरी कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण दिसत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर जळगाव शहरात प्रथमच शिवसेना शिंदे गटाचे मध्यवर्ती कार्यालय हे उभारले जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या कार्यालयाचे काम सुरू असून कार्यालयाचे काम जवळपास पूर्ण झालेले आहे. मात्र या कार्यालयात भूत असल्याची भीती ही कार्यकर्त्यांमध्ये असल्याने या नव्या कार्यालयाकडे या भितीपोटी कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली आहे.
चर्चांना पूर्णविराम..
याबाबत भाषणादरम्यान गुलाबराव पाटील यांनी स्पष्टकरण केले आहे. तसेच ही केवळ अफवा असल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले. जळगावच्या शिवसेना कार्यालयात काही असामान्य घटना घडत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. या अफवांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, मंत्री गुलाबराव पाटील यांनी या गोष्टींना गांभीर्याने न घेता, “हे अफवांचे भूत आहे,” असे म्हणत या चर्चांना पूर्णविराम दिला.
मंत्री पाटील यांनी या अफवांमागे राजकीय विरोधकांचा हात असल्याचा आरोप केला. “विरोधकांना आमच्या कामगिरीवर टीका करता येत नाही, म्हणून ते अशा अफवा पसरवत आहेत,” असे ते म्हणाले. या अफवांमुळे काही काळ कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, मंत्री पाटील यांच्या स्पष्ट वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.