जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात शिवसेनेत राजकीय भुकूंप झाल्याने सर्वच हादरले आहेत. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले आहे. त्यांना सेनेच्या निष्ठावान नेत्यांनी पाठींबा दिला आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटीलांसह, आ. चिमणराव पाटील, आ. किशोर पाटील, आ. लता सोनवणे, सेना पुरस्कृत चंद्रकांत पाटील यांनीही एकनाथ शिंदेंना पाठींबा देत त्यांच्यासोबतच आहेत. जिल्ह्यात व राज्यात शिवसेनेचे ही केविलवाणी स्थिती पाहून शिवसैनिकांमधून संताप तर परतण्याचे भावनिक आवाहन केले जात आहे. ते मुदतीत न परतल्याने सेनाप्रमुखांनी त्यांच्या परतीचे मार्ग पुरते बंद केले आहेत. त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांवर संताप व्यक्त केला आहे. पालकमंत्र्यांच्या गावातच त्यांचा पुतळा जाळण्यात आला.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, जळगावच्या महापौर जयश्री महाजन, महिला कार्यकर्त्या यांनी यांनी एकनाथ शिंदेंना परतण्याचे भावनिक आवाहन करताना रडूच कोसळले. पक्षप्रमुख व बंडखोर दोघेही आपल्या मतांवर ठाम आहेत. मात्र जिल्ह्यातील कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत. घडू नये ते घडल्याने सर्वांनाच कमालीचा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या निवडणुक निकालादरम्यान राष्ट्रवादीचे एकनाथराव खडसे विजयाच्या टप्प्यात असताना महापालिकेतील काही नगरसेवक नाराजीमुळे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची कुजबूज ऐकू आली होती.
सदरचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा राजकीय भुकंप झाल्याने सर्वच सैरभैर झाले आहेत. हे नाट्य घडण्याआधी महापौर जयश्री महाजन या एकनाथ शिंदेंना विकासकामांचा निधी मिळण्यासाठी व आकृतीबंध व अन्य मागण्यांसाठी भेटीला गेल्या होत्या. त्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. मात्र दुसऱ्याच दिवशी हा प्रकार घडल्याने महापालिकेतील नगरसेवक, शिवसैनिक संभ्रमात पडले आहेत. एकीकडे सर्वांनाच पक्षाने भरभरून दिले असल्याने पक्षाबद्दल असलेली निष्ठा, कृतज्ञता तर दुसरीकडे महापालिकेला भरभरून निधी देणारे राजकारणातील सज्जन एकनाथ शिंदे अशा द्विधा अवस्थेत शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते सापडले आहेत.
शेवटी सर्वांनीच आपापल्या कष्टाने बांधलेले हे घरटे मोडू नये अशी आर्त भावना प्रत्येकाची आहे. दोघेही हवे असल्याने दोघांकडून काही तरी तोडगा निघेल अशी आशा सर्वांनाच लागून राहिलेली आहे.