जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या कृती कार्यक्रम योजनेचा निकाल जाहीर झाला असून नाशिक विभागामध्ये पोलीस निरीक्षक संवर्गामध्ये सर्वोत्तम निरीक्षक म्हणून एमआयडीसी पोलीस ठाण्याचे संदीप पाटील यांनी पटकावला आहे.
100 दिवस सुधारणा कार्यक्रमांतर्गत करावयाच्या कामांबाबत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सातत्याने मार्गदर्शन करून आढावा घेत पोलीस दलाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध कार्यालयांना, पोलीस ठाण्यांना सुधारणा कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने कार्यालयीन सुधारणा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून आवश्यक त्या सुविधा व उपाययोजना करणेबाबत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उपविभाग स्तरावर एमआयडीसी पोलीस स्टेशन सर्वोत्तम ठरले आहे. दुसरा क्रमांक अहिल्यानगर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस स्टेशनचा तर तृतीय क्रमांक धुळे जिल्ह्यातील पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनचा आला आहे.
जनसेवकाच्या भूमिकेतून कार्य
पोलीस हा जनतेचा मित्र असून नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला तर त्यातून सकारात्मक ऊर्जा बाहेर येते. शंभर दिवसात शासनाला अपेक्षित काम केल्याचे समाधान असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले. लोकांना पासपोर्टची सेवा शंभर टक्के वेळेत पुरवणे, चारित्र्य पडताळणी वेळेत देणे यासह परिसरात स्वच्छता, जुने मुद्देमाल निर्गती करणे, रेकॉर्ड अद्ययावत करून जुना रेकॉर्ड नष्ट करण, कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेळोवेळी प्रशिक्षण घेऊन त्यांना प्रशिक्षित करणे हे काम गेल्या शंभर दिवसात करण्यात आले. ‘एक सत्र विद्यार्थ्यांसाठी’, सर्वोत्कृष्ट अंमलदार हा पुरस्कार देऊन गौरव करणे, सामाजिक ऐक्य जोपासताना एकता होळी हा उपक्रम राबवित समाजात सलोखा घडविण्यावर भर देण्यात आला आहे.

