जळगावकरांना उन्हाचा चटका; तापमान वाढीचा अंदाज

0

जळगाव शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जाणवणारी कडाक्याची थंडी आता कमी होऊ लागली आहे. तापमानात हळूहळू वाढ होत असल्याने दिवसा उन्हाचा तीव्रपणा जाणवू लागला आहे. रविवारी जळगावमध्ये किमान तापमान १३.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर कमाल तापमान ३२.५ अंशांपर्यंत पोहोचले. येत्या महाशिवरात्रीपर्यंत तापमान ३८ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच दिवसाचे तापमान ३२ अंशांवर पोहोचल्यामुळे नागरिकांना सध्या दुहेरी हवामानाचा अनुभव येत आहे. दिवसा उन्हाची तीव्रता वाढत असून रात्री वाऱ्याची दिशा बदलल्यानंतर थोडी थंडी जाणवते. हिवाळ्याचा प्रभाव पूर्णपणे कमी झालेला नसला तरी उन्हाळ्याची चाहूल लवकर लागण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यानंतर दिवस आणि रात्री दोन्ही तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

आजचे हवामान : आज (९ फेब्रुवारी) हवामान प्रामुख्याने स्वच्छ आणि कोरडे राहण्याचा अंदाज आहे. दिवसा कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते, त्यामुळे दुपारच्या वेळी उष्णता अधिक जाणवेल. पुढील सहा दिवस पावसाची शक्यता नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

सूर्यकिरणांची तीव्रता वाढणे आणि दिवस लांब होणे यामुळे दुपार व संध्याकाळी उकाडा जाणवेल. मात्र, रात्री जमिनीजवळ थंड हवा टिकून राहिल्याने किमान तापमान १४ ते १६ अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सकाळी आणि रात्री गारवा कायम राहणार आहे. १४ आणि १५ फेब्रुवारीपासून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून उष्णतेची तीव्रता वाढेल. त्यामुळे नागरिकांनी कुलर-फॅन दुरुस्तीसाठी काढण्यास सुरुवात केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.