महापौरपदाकडे लागल्या जळगावकरांच्या नजरा!

शिवसेनेची उपमहापौरपदी वर्णी : स्वीकृतसाठी अनेकांची फिल्डिंग

0

राजेश यावलकर

जळगाव : महानगरपालिकेत महायुतीने एकहाती सत्ता स्थापन करत राजकीय वर्चस्व सिद्ध केले असले, तरी आता खरी उत्सुकता महापौरपद आणि उपमहापौरपदाच्या चेहऱ्यांबाबत आहे. सत्ता आली असली, तरी पदांचे वाटप, आरक्षणाचे गणित आणि अंतर्गत राजकारण यामुळे सध्या सत्ताधारी गोटातच सर्वाधिक चर्चा रंगताना दिसत आहे. विशेषतः महापौर कोण होणार? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी अनेकांनी फिल्डिंग देखील लावण्यास सुरुवात केली आहे.
महायुतीने निवडणुकीत अपेक्षेपेक्षा अधिक जागा मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले. भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांची ही एकत्रित ताकद मतपेटीत उतरली आणि विरोधकांना सावरायला वेळच मिळाला नाही. मात्र निवडणूक जिंकण्यापेक्षा सत्ता टिकवणे आणि सर्व घटकांना समाधान देणे हे अधिक कठीण असते, याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे. कारण आरक्षण जाहीर झाल्यानंतर महापौरपदावर कोण बसणार? यावरून सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. महापौरपदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निघते, यावर अनेक संभाव्य नावे अवलंबून आहेत. भाजपकडून काही अनुभवी नगरसेवकांची नावे चर्चेत आहेत. शहर विकास, निधीचे वाटप, प्रलंबित प्रकल्प, रस्ते, पाणीपुरवठा अशा अनेक मुद्द्यांवर आगामी महापौराची भूमिका महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे केवळ पक्षनिष्ठा नव्हे, तर प्रशासनावर पकड, अनुभव आणि जनसंपर्क यांचा विचार व्हावा, अशी अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

उपमहापौरपद शिवसेनेलाच मिळणार!
महापालिकेत संख्याबळाच्या तुलनेत दोन नंबरवर असलेल्या शिवसेनेला उपमहापौरपद मिळणार हे जवळपास स्पष्ट झाले असले, तरी त्या पदावर नेमकी कुणाची वर्णी लागणार यावरून संभ्रम कायम आहे. शिवसेनेतील काही ज्येष्ठ नगरसेवक या पदासाठी इच्छुक असून, तरुण नेतृत्वालाही संधी द्यावी, असा आग्रहही काहींंकडून धरला जात आहे.

स्वीकृत नगरसेवकपदासाठी फिल्डिंग
स्वीकृत नगरसेवकांची निवड हा आणखी एक महत्त्वाचा आणि तितकाच संवेदनशील मुद्दा ठरतो आहे. कोणत्या पक्षाला किती स्वीकृत नगरसेवक, त्यात सामाजिक समतोल, राजकीय निष्ठा आणि भविष्यातील रणनीती यांचा मेळ कसा घालायचा, यावर सत्ताधारी नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या माध्यमातून सत्ता अधिक मजबूत करता येते, हे लक्षात घेऊन सर्वच पक्ष आपापले गणित मांडत आहेत. भाजप, शिवसेनेच्या अनेक निष्ठावंतांनी स्वीकृतसाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.