जळगावात गुलाबराव विरुद्ध गुलाबराव संघर्ष

देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, गुलाबराव पाटलांचा थेट इशारा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून रिंगणात असलेले माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा दारुण पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी देवकर यांचे भ्रष्टाचार आपण काढणार असून त्यांना सोडणार नसल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे जळगावमध्ये गुलाबराव पाटील विरुद्ध गुलाबराव देवकर यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात  महायुतीकडून गुलाबराव पाटील तर महाविकास आघाडीकडून गुलाबराव देवकर यांच्यात लढत झाली होती. या लढतीत गुलाबराव देवकर यांचा पराभव झाला होता. या पराभवानंतर देवकर यांनी आपण अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर अजित पवार यांच्या गटातून त्यांना विरोध झाल्याचे दिसून आले. अजित पवार यांनीही देवकर यांच्या प्रवेश निर्णयाबाबत कोअर कमिटी निर्णय घेईल अस सांगत या विषयाला सध्या शांत केले आहे.

विरोधी पक्षात राहून आपल्याला आणि आपल्या कार्यकर्त्यांना कामे करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने आपण निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे गुलाबराव देवकर यांनी म्हटले. तर दुसरीकडे गुलाबराव देवकर यांना पराभव झाल्यानंतर सत्ताधारी पक्षात जाण्याची घाई का झाली? त्यांचे अनेक ठिकाणी असलेले भ्रष्टाचार टाळता यावे यासाठी ते असा प्रयत्न करत असले तरी त्यांना अजित पवार गटातून विरोध होत आहे. आपणही त्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार असून, त्यांना सोडणार नसल्याचा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.