सर्वत्र लिंगभेदभाव नष्ट झाला पाहिजे : डॉ. प्रीती अग्रवाल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव : महिला सक्षमीकरणासाठी घरात-समाजात भेदभाव टाळून सर्वत्र लिंगभावसमानता आली पाहिजे. स्त्रियांच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजे. आज महिलांच्या बाबत ‘चूल व मूल’ हि संकल्पना गळून पडली असून त्या आता कंबर कसून संघर्ष करीत आपापल्या क्षेत्रात अग्रेसर आहेत, विविध क्षेत्रात महिलांनी  आपले स्थान मजबूत केलेले आहे, असे प्रतिपादन रायसोनी शैक्षणिक संस्थेच्या संचालिका तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रीती अग्रवाल यांनी केले.

येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सहकार्याने धनाजी नाना चौधरी विद्याप्रबोधिनी संस्थेच्या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयातर्फे “महिला सक्षमीकरण :शाश्वत विकासाची गुरुकिल्ली” हा विषय घेऊन शनिवारी ९ एप्रिल रोजी  सहावी  एकदिवसीय बहुविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी परिषदेचे उदघाटक म्हणून डॉ.अग्रवाल बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनाजी नाना चौधरी विद्याप्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष आ. शिरीष चौधरी हे होते. प्रमुख पाहुणे केंद्राच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या प्रादेशिक संचालिका सारिका डफरे, प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, संचालक प्रा. डॉ. विनय पाटील, प्रा.डॉ. जयश्री महाजन, प्राचार्य डॉ.जयश्री नेमाडे, फ्रुट सेल सोसायटी चेअरमन भालचंद्र चौधरी, प्राचार्य डॉ. राकेश चौधरी  प्राचार्य डॉ. आर.बी. वाघुळदे उपस्थित होते.

समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राकेश चौधरी यांनी प्रास्ताविकात या परिषदेच्या आयोजनाविषयी माहिती सांगून महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने विचारमंथन महत्वाचे असल्याचे सांगितले. लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करीत परिषदेचे उदघाटन केले.  या वेळी राष्ट्रीय परिषदेची शोधनिबंध पुस्तिका ‘जर्नल ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट” चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशिन करण्यात आले. संस्थेचे सचिव तथा प्राचार्य डॉ. पी.आर.चौधरी यांनी मनोगतातून, कुटुंबात सुसंवाद असेल तर महिला सशक्तीकरणाला बळ येते. यासाठी संस्कार, सामाजिक बांधिलकी महत्वाची असल्याचे सांगितले.

डॉ. प्रीती अग्रवाल यांनी सांगितले की, माणूस म्हणून आजही महिलांना पहिले जात नाही. घर, शिक्षण आणि माध्यमे या तीन ठिकाणी महिलांविषयी दुय्यमता आजही आढळून येते. त्यामुळे महिलांचा सन्मान होत नाही. घरातही मुलगा-मुलगी भेदभाव केला जातो.जाहिरात, मालिकांतून लिंगभेदभाव केला जात आहे. त्यामुळे समाजात चुकीची मानसिकता वाढीस लागत आहे. त्यामुळे घरापासून, शाळेत आणि माध्यमात स्त्रियांना दुजाभाव देणे बंद केले पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.

अध्यक्षस्थानावरून आ. शिरीष चौधरी म्हणाले की,  प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग हा दिवसागणिक  हा वाढत जरी असला तरी त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण कामाचा गौरव होतांना दिसत नाही. तसेच समाज विकासात पायाभूत सुविधा व विकासासाठी तळागाळात काम करणाऱ्या महिलांची सुरक्षितता व सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून या परिषदेच्या निमित्ताने संशोधकांच्या शोधनिबंधाचा महिला सक्षमीकरणाच्या धोरण निर्मितीसाठी नक्कीच उपयोग होईल, असेही त्यांनी सांगितले. राजकीय क्षेत्रात महिला आरक्षण हे ३३ % आहे ते ५० % झालं तरच राजकीय क्षेत्रातातील सर्वच संघटनांना महिला नेतृत्व मिळेल हि गरज जो पर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत हा बदल आपणास दिसणार नाही, हे विचार देखील आ. चौधरी यांनी मांडले.

सूत्रसंचालन राष्ट्रीय परिषदेच्या समन्वयक प्रा.डॉ.कल्पना भारंबे यांनी तर आभार आयोजन सचिव डॉ.सुनीता चौधरी यांनी मानले. परिषद यशस्वी होण्यासाठी डॉ.यशवंतराव महाजन, प्रा. डॉ. निलेश चौधरी, डॉ.उमेश वाणी, डॉ. शाम सोनवणे, डॉ. नितीन बडगुजर, डॉ.योगेश महाजन, डॉ. प्रशांत भोसले, डॉ. जुगल घुगे, डॉ. भूषण राजपूत, डॉ.दीपक महाजन, डॉ.अशोक हनवते, कार्यालयीन अधीक्षक धनंजय महाजन, ग्रंथपाल किशोर भोळे, यांच्यासह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

बिजभाषण

राष्ट्रीय परिषदेत केंद्र सरकारच्या कामगार केंद्र, नाशिक येथील प्रभारी प्रादेशिक संचालिका सारिका डफरे यांनी बीजभाषण केले. त्या म्हणाल्या की, महिला सक्षमीकरण हा आता आंतरराष्ट्रीय अजेंडा बनला आहे. युनायटेड नेशन्सच्या चार्टरने महिलांवरील भेदभाव हा सार्वत्रिक धोक्याची समस्या म्हणून लक्षवेधी केला आहे.

स्त्रिया आणि मुली जगाच्या निम्म्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात. शाश्वत विकासासह शांततामय समाज साध्य करण्यासाठी सर्व प्रकारची समानता आवश्यक आहे. महिला सक्षमीकरणामुळे उत्पादकता आणि आर्थिक वाढ होते. महिला आणि मुलींवरील सर्व प्रकारचा भेदभाव समाप्त करणे; महिला आणि मुलींचे हिंसा आणि शोषण समाप्त करणे; अपत्य, लवकर आणि सक्तीचे विवाह आणि स्त्री जननेंद्रियाचे विच्छेदन यासारख्या हानिकारक प्रथा काढून टाकणे; आर्थिक संसाधने, मालमत्ता मालकी आणि महिलांसाठी आर्थिक सेवा समान हक्क वाढवणे; तंत्रज्ञानाद्वारे महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे महत्वाचे आहे.

आता महिलांमध्ये गुंतवणूक करण्याची आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी एक समृद्ध आणि शाश्वत जग सुनिश्चित करण्यासाठी मान्य केलेली शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करू शकेल याची खात्री करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सरकार, समाज, स्त्री स्वतः आणि स्वयंसेवीसंस्था, विविध स्वायत्त संस्थांच्या पातळीवर सातत्याने प्रयत्न होणे गरजेचे आहे. जो महिला सक्षमीकरणाचा केंद्र बिंदू आहे. असेही प्रभारी प्रादेशिक संचालिका सारिका डफरे यांनी बीजभाषणात सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.