मनपा आयुक्तांच्या संशयास्पद कारभाराची चौकशी करावी – राष्ट्रवादीची मागणी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव महापालिकेचे आयुक्त सतिश कुळकर्णी यांच्या संशयास्पद कारभाराची चौकशी करण्यात यावी, असे मागणीपर निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस महानगरचे जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात येत आहे.

गेल्या अडीच वर्षांपासून जळगाव महानगरपालिकेचे आयुक्तपदी सतीश कुळकर्णी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांची नेमणूक झाल्यापासून त्यांच्या कार्यपद्धतीबाबत संशयास्पद कामगिरीमुळे गैरव्यवहार व भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालणे, शिक्षा झालेल्या नगरसेवकांबाबत ठोस भूमिका न घेणे, वाटरग्रेस, अमृत योजना, भुयारी गटारी योजना, घनकचरा प्रकल्प, एलईडी लाईट पुरवठा, नियमबाह्य नेमणुका, नियमबाह्य ठरावांची अंमलबजावणी यामध्ये आयुक्तांची संशयास्पद भूमिका असून जळगाव शहर महानगरपालिका प्रशासन भ्रष्टाचाराबाबत चर्चेत आहे.

तसेच महानगरपालिकेच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे. अनेक कामे बेकायदेशीरपणे सुरू असून वाढीव कराचा अंदाजपत्रके देणे, वर्कऑर्डर नसताना कामे करणे, अनेक काम करण्याची मुदत संपत असताना मुदतवाढ देणे व निविदा अटी शर्तीनुसार दंड आकारणी न करणे, असा मनमानी कारभार सुरू आहे. परंतु कोणत्या कामाबाबत दखल न घेतल्यामुळे भ्रष्टाचार करण्याची हिम्मत वाढत आहे. केंद्राकडून व राज्याकडून व नियोजन समितीकडून येणारा निधीतून करण्यात येणाऱ्या कामाबाबत तक्रारी वाढत आहे. ठेकेदारांकडून तीन ते पाच टक्के हिस्स्याची मागणी केली जात आहे. अशी तक्रार अभियंता अरविंद भोसले यांनी मंत्रालयात तक्रार दिली आहे.

दरम्यान जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या संशयास्पद कामाची व अभियंता अरविंद भोसले यांच्या तक्रारीची दखल घेऊन आयुक्त सतिष कुळकर्णी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here