जळगावात महिलेची निर्घृण हत्या.. डोक्यात लोखंडी हत्याराने वार
पती दुकानावर अन् पत्नी रक्ताच्या थारोळ्यात, गणेशवाडी परिसरातील धक्कादायक घटना
जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
शहरातील पंचमुखी हनुमान मंदीरामागे असलेल्या गणेशवाडी परिसरातील रणछोड नगरामध्ये एका महिलेच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. सुवर्णा राजेश नवाल (वय ५७) असे हत्या झालेल्या महिलेचं नाव असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील गणेशवाडी परिसरातील रणछोड नगरामध्ये सुवर्णा नवल या महिला आपल्या पती राजेश नवाल यांच्यासह राहत होत्या. त्यांचे पती राजेश नवाल हे दाना बाजार परिसरामध्ये धान्याचे व्यापारी आहेत. गुरुवारी रात्री ८.३० वाजेच्या पूर्वी सुवर्णा नवाल ह्या घरी एकट्या असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात घुसून लोखंडी वस्तूने त्यांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केला.
दरम्यान रात्री ८.३० वाजता मयत सुवर्णा नवल यांचे पती राजेश नवाल हे घरी आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनांसाठी धाव घेतली आणि पुढच्या चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे.
खून कोणत्या कारणामुळे करण्यात आला या संदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही. या घटनेने जळगाव शहरामध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्या पश्चात पती राजेंद्र नवाल, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.