जळगावात तरूणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटजवळ असलेल्या मालधक्क्याजवळ गोदामाच्या समोर पहाटे एका तरुणाची दगडाने ठेचून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अधिक तपासाअंती हत्या झालेला मयत तरुण हा अनिकेत गणेश गायकवाड (रा. राजमालती नगर जळगाव) असल्याची माहिती मिळाली आहे. यानुसार पोलिसांनी या तरूणाच्या कुटुंबियांना पहाटे अडीच वाजता याबाबतची माहिती दिली.

याप्रकरणी मयत तरूणाचे वडील गणेश रमेश गायकवाड यांनी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली. तरुणाचे वडील गणेश गायकवाड हे राजमालती नगर जळगाव येथे पत्नी सारीका आणि दोन मुले अनिकेत (मयत), विशाल यांच्यासह राहतात. ते सुरत रेल्वे गेटजवळ येथील माल धक्यावर हमाली काम करतात. तर त्यांची दोन्ही मुले मिस्तरी काम करतात. काल दि. २४ मे रोजी ते रात्री साडेआठच्या सुमारास कामावरुन घरी आले. त्यावेळी अनिकेत हा घरी नव्हता, मुलगा अनिकेत हा नेहमी घराबाहेर असायचा व केव्हाही घरी यायचा. म्हणुन ते त्याची वाट न पाहता जेवण करुन झोपुन गेले. दरम्यान रात्री अडीच वाजेच्या सुमारास गल्लीतील अर्जुन धोबी हे पोलिसांसह आले. त्यांनी पिप्राळा रेल्वे गेटजवळ मालधक्क्याच्या गोडावुन समोर एक मृतदेह आढळला असून सदरच्या प्रेताचा चेहरा अनिकेत सारखा असल्याची माहिती त्यांना दिली. यानंतर मयताची ओळख पटवण्यासाठी पोलीस त्यांना घटनास्थळी घेऊन गेले.

पिंप्राळा रेल्वे गेटजवळील माल धक्याजवळ गोडावुनचे बाहेर एक प्रेत पडलेले होते. या मृतदेहाच्या डोक्याचा भाग पुर्णपणे चेंदामेंदा झालेला होता. त्याच्या बाजुला रक्ताने भरलेला मोठा दगड पडलेला होता. सदर प्रेताचा चेहरा ओळखु येत नव्हता तेव्हा सदर प्रेतांचे अंगावरील कपड्यावरुन व त्याचे हातातील कड्यावरुन व पायातील काळ्या रंगाचा दोर्‍यावरुन सदर मयत मुलगा हा अनिकेत असल्याचे समजले.

मयताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, दि. २५ मे रोजी रात्री ०१.३० वाजे पुर्वी जळगाव शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटजवळील माल धक्क्याचे गोडावुन समोर माझा मुलगा अनिकेत गणेश गायकवाड यांचा कोणीतरी डोके दगडाने ठेचुन खुन केला आहे. म्हणुन माझी अज्ञात आरोपींविरुद्ध कायदेशिर फिर्याद देत असल्याचे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान या फिर्यादीवरून शहर पोलीस स्थानकात अज्ञात मारेकर्‍यांच्या विरोधात भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शहर पोलीस स्थानकाचे कर्मचारी पुढील तपास करत आहेत. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू असल्याचे समजते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.