सर्वच आघाड्यांवर जळगाव मनपा अपयशी

0
43

माजी मंत्री सुरेश दादा जैन यांच्या नेतृत्वात असलेली खान्देश विकास आघाडीच बरी होती, असे आता जळगावकर नागरिक बोलू लागले आहेत. जळगाव शहर महानगरपालिकेत सव्वा तीन वर्षापूर्वी खानदेश विकास आघाडीची सत्ता जाऊन भाजपने सत्ता काबीज केली. भाजपतर्फे जळगावकरांना विकासाचे आमिष दाखवून सत्ता काबीज केली. जळगावकरांनी भाजपच्या पारड्यात भरभरून मतदान केले. 75 पैकी भाजपच्या 53 नगरसेवकांना या विजयी केले. एका वर्षात विकास झाला नाही तर राजूमामा भोळे यांच्यासाठी मते मागण्यास येणार नाही, अशी भावनिक साद भाजपचे तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी घातली. त्याला जळगावकर बळी पडले. परंतु भाजपच्या अडीच वर्षाच्या कालावधीत दोन महापौर झाले. भाजप नगरसेवकांमध्ये आपापसात भांडणे सुरू झाली. तीस नगरसेवकांनी बंड केले आणि 15 नगरसेवक असलेल्या शिवसेनेशी हातमिळवणी केली. अडीच वर्षे आपापसातील भांडणात गेली. विकासाच्या नावाने बोंबाबोंब. मात्र सत्तांतर झाले. भाजपची बहुमताच्या सत्तेला सुरुंग लागली आणि 14 महिन्यांपूर्वी शिवसेनेचा महापौर उपमहापौर यांच्या रुपाने भगवा फडकला.
सत्तांतरानंतर शिवसेनेकडून जळगावकरांच्या अपेक्षा उंचावल्या. परंतु ये रे माझ्या मागल्या अशीच स्थिती महापालिकेत निर्माण झाली. भाजपच्या कारकिर्दीत शिवसेनेचे नगरसेवक विरोधी पक्ष नेते सुनील महाजन दररोज माध्यमांसमोर जाऊन भाजप विरोधात आगपाखड करीत होते. परंतु गेल्या चौदा महिन्यांपासून त्यांच्या धर्मपत्नी सौ जयश्री महाजन या महापौर झाल्या आणि सुनील महाजन यांचा आवाज बंद झाला. सत्ता शिवसेनेची असतानासुद्धा त्यांच्याकडे महापालिकेत विरोधी पक्षनेते पद कायम आहे. तांत्रिक दृष्ट्या त्या पदावर ते राहू शकत असले तरी, नैतिक दृष्ट्या विरोधी पक्ष नेते पदाचा त्यांनी त्याग करायला हवा होता. परंतु सध्या नैतिकता वगैरे पाळले जात नाही. त्यांचे त्यांना काहीच वाटत नाही. परंतु सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे काम विरोधी पक्ष आणि विरोधी पक्ष नेत्यांकडून होते, असे लोकशाहीत मानले जात असले आणि ते खरे असले तरीही जळगाव महापालिकेत याचा बोजवारा उडालेला आहे. त्यामुळे भाजपचे सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेकडून जळगाव शहराची जी विकासाची कामे व्हायला हवी होती ती होत नाही. जळगाव महापालिकेच्या वतीने नागरिकांसाठी ज्या मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे त्या सुविधांची पूर्तताही केली जात नाही. अमृताची पाणीपुरवठा योजना गेल्या साडेतीन वर्षांपासून रखडलेली आहे. अजूनही तिचे काम पूर्ण झालेले नाही. अमृतचे पाणी अद्याप मिळू शकत नाही. परंतु सध्या महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा देखील अशुद्ध होत आहे, हे जळगावकरांचे दुर्दैव म्हणावे लागेल. भुयारी गटार योजना अशाच प्रकारे रखडलेली आहे. त्यामुळे या दोन्ही योजनांसाठी शहरातील रस्ते खोदून रस्त्यांची चाळणी झाली आहे. परिणामी पावसाळ्यात चिखल आणि इतर महिने धूळ व खड्डे यांचा सामना करावा लागतो.
जळगाव शहर महापालिकेतील प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या विकासकामांचा अजब प्रकार म्हणावा. लागेल शिवाजीनगर उड्डाणपूल रखडलेला आहे. शहरातील महामार्गावरील चौपदरीकरणा नंतर पथदिव्यांचा प्रश्न रखडलेला आहे. अंधारामुळे अपघात होत आहे. त्याचे कुणाला काही घेणेदेणे नाही. शहरातील स्वच्छतेच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. स्वच्छतेचा ठेका दिलेल्या वॉटर ग्रेस कंपनीचा ठेका रद्द करण्याचे ठरले असतानाही ते रद्द केले जात नाही. महापालिकेच्यावतीने कचऱ्यापासून खत प्रकल्प बनविण्याच्या कारखान्याचे काम रखडले आहे. शहरातील विविध भागात गटारी तुंबलेल्या आहेत. त्यांची साफसफाई केली जात नाही. अशी नागरिकांची ओरड आहे. पाण्याच्या संदर्भात महापालिकेवर आलेल्या मोर्चेकऱ्यांची ओरड रास्त होती, असेच म्हणावे लागेल. शहरातील रस्त्यांसाठी 42 कोटी रुपये मंजूर असताना, त्याचे काम ठेकेदाराला दिले गेले असताना, तांत्रिक मुद्दे पुढे करून ठेकेदाराला कामाची ऑर्डर दिली गेली नाही. आता ठेकेदाराला रस्त्यांच्या कामाची ऑर्डर दिली गेली. तेव्हा पावसाळ्याला प्रारंभ होणार असल्याने ठेकेदाराला ऑर्डर दिली असली तरी आता चार महिने शहरातील रस्त्यांची कामे ठेकेदार करू शकणार नाहीत. या सर्व प्रकारामुळे आणि महापालिकेच्या गोंधळामुळे जळगाव शहराची जनता भरडली जात आहे. एकंदरीत जळगाव शहराला कोणी वाली आहे की नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here