लोकशाही संपादकीय लेख
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. आता दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊन 15 जानेवारीला मतदान व 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. मुंबई महापालिकामध्ये तसेच इतर महापालिकेसाठी उद्धव आणि राज ठाकरे यांचे युती जाहीर होताच महायुतीतर्फे सर्वत्र महायुती करण्यासाठी (पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका वगळता) घोषणा होत आहे. जळगाव महानगरपालिका भाजप आणि शिवसेना स्वबळावर निवडणुका लढवणार होते. परंतु कालच भाजप आणि शिवसेनेची युती झाल्याची घोषणा भाजप आणि शिवसेना स्थानिक नेत्यांनी केली. राष्ट्रवादी अजित पवार गट बरोबर सुद्धा युती होणार असून त्यांच्याशी लवकरच बोलणी करण्यात येणार असल्याचे आमदार मंगेश चव्हाण आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
भाजपमध्ये 500 जण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार असून त्यांच्या मुलाखती पार पडलेल्या आहेत. शिवसेनेतर्फे 300 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी पक्षातर्फे सुद्धा 300 उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. जळगाव महानगरपालिकेत एकूण नगरसेवकांच्या एकूण 75 जागा आहेत. त्यामुळे महायुती झाली तर एकूण 75 जागांसाठी तिन्ही पक्ष मिळून 1100 इच्छुक उमेदवारांमधून जागा वाटपाचे सूत्र कसे असेल, हा एक गंभीर प्रश्न महायुती समोर आहे. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षातून इन्कमिंग झालेले आहे. भाजपलाच 75 जागा अपुऱ्या पडतील. 2018 च्या निवडणुकीत भाजपने एकूण 75 पैकी 57 जागा जिंकल्या होत्या. तेव्हा यावेळी भाजपच्या वाट्याला किती आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला किती जागा दिल्या जातील हे महत्त्वाचे ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार जळगाव मनपामध्ये शिवसेनेला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तर महायुती होईल, अन्यथा स्वबळावर आम्ही लढू, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पूर्वीच घोषित केले आहे. सन्मानपूर्वक म्हणजे किती तर शिवसेनेला 25 जागा हव्या आहेत; तरच युती होईल. राष्ट्रवादी बरोबर बोलणी झाली तर भाजपतर्फे त्यांच्याकडे असलेल्या पन्नास जागांपैकी काही जागा द्यायच्या असतील तर त्यांनी त्यांच्या कोट्यातील द्याव्यात, असे मत शिवसेनेच्या सूत्रांकडून समजते. त्यामुळे महायुतीची गोष्ट झाली असली तरी जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही; तो तिढा कळीचा मुद्दा ठरणार आहे.
23 डिसेंबर पासून जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी उमेदवारी अर्ज भरण्याचा तिसरा दिवस असला तरी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. एकूण ७५ जागांसाठी आजपर्यंत एकूण तेराशे पेक्षा जास्त उमेदवारी अर्जची विक्री झाली असली तरी अद्याप एकही उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयात दाखल झालेला नाही. पक्षातर्फे उमेदवारी अर्जासोबत पक्षाचा एबी फॉर्म जोडणे आवश्यक आहे. म्हणून पक्षातर्फे तसेच अपकशांकडूनही अद्याप ’वेट अँड वॉच’ची सावध भूमिका घेतली जात आहे. सर्वच पक्षातर्फे उमेदवार निश्चित होत नाही, तोपर्यंत उमेदवारी अर्ज भरले जाणार नाहीत. आता उद्या 26 तारखेपासून 30 तारखेपर्यंत अर्ज कसे दाखल होतात हे पाहावे लागणार आहे. सोमवार 29 आणि मंगळवार 30 हे दोन दिवस अर्ज दाखल करण्याची गर्दी होईल असे दिसते. दरम्यान सर्वाधिक उमेदवारांची गर्दी भाजपमध्ये असल्याने भाजपला बंडखोरी होण्याची भीती आहे. ती बंडखोरी कशी रोखायची ही गंभीर समस्या आहे. त्यामुळे जळगाव मनपात महायुतीची घोषणा झाली असली तरी जागा वाटपाचा तिढा कसा सुटेल हे बघावे लागणार आहे. जे महायुतीचे तेच महाविकास आघाडीचे होणार आहे. त्यातच आता उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांची युती झाल्याने तेथेही उमेदवारांची भाऊ गर्दी झालेली आहे..!

