जळगावकरांसाठी आनंदवार्ता! २६ ऑक्टोबरपासून जळगाव-मुंबई विमानसेवा दररोज
अलायन्स एअरची मोठी घोषणा; केवळ दीड तासांत मुंबई गाठता येणार
जळगाव | प्रतिनिधी
जळगावकरांसाठी ही खऱ्या अर्थाने आनंदाची बातमी आहे. सध्या आठवड्यातून चार दिवस सुरू असलेली जळगाव–मुंबई विमानसेवा आता दररोज सुरू होणार आहे. २६ ऑक्टोबरपासून अलायन्स एअर कंपनीकडून ही सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध होणार असून, यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर आणि जलद होणार आहे.
सध्या उड्डाण योजनेअंतर्गत जळगाव विमानतळावरून गोवा, पुणे, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबाद या शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध आहे. यापैकी मुंबईकडे प्रवाशांचा सर्वाधिक ओघ पाहता अलायन्स एअरकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
व्यापार, उद्योग, शिक्षण, मंत्रालयीन कामकाज आणि वैद्यकीय उपचारांसाठी दररोज शेकडो प्रवासी मुंबईकडे प्रवास करतात. प्रवाशांच्या या उत्तम प्रतिसादामुळे आता ही सेवा आठवड्यातील सातही दिवस सुरू राहणार आहे.
सध्या २६ ऑक्टोबरपर्यंत मुंबईहून जळगावसाठी रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार, तर जळगावहून मुंबईसाठीही त्याच दिवशी सेवा दिली जात आहे. मात्र, २६ ऑक्टोबरनंतर ही विमानसेवा दोन्ही बाजूंनी दररोज उपलब्ध होईल.
मुंबई–जळगाव उड्डाण वेळा:
सुटणे: सायंकाळी ७:१० वाजता
आगमन: रात्री ८:२५ वाजता
जळगाव–मुंबई उड्डाण वेळा:
सुटणे: रात्री ८:५० वाजता
आगमन: रात्री १०:१० वाजता
या निर्णयामुळे जळगावकरांना आता मुंबई गाठण्यासाठी केवळ दीड तासांचा वेळ लागणार असून, रेल्वे आणि रस्तेमार्गावरील प्रवासाला एक पर्याय उपलब्ध होणार आहे. स्थानिक व्यावसायिक, विद्यार्थी व नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, या सेवेमुळे जळगावच्या प्रगतीला नवे पंख मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.