चोराच्या हातीच मनपाच्या चाव्या ?

0

मन की बात (दीपक कुलकर्णी)

‘चोर तर चोर वरुन शिरजोर’असा एक वाक्‌प्रचार आपल्याकडे प्रचलित आहे. याच वाक्‌प्रचाराचा अनुभव आता जळगावकर घेत आहेत. महानगरपालिकेसारख्या महत्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत महाजन दाम्पत्य सोबतच लोकप्रतिनिधी म्हणून काम पहात होते. बायको महापौर अन्‌ पती विरोधीप क्षनेता असा अजब प्रकार या संस्थेत पाहवयाच मिळाला. विरोधी पक्षनेत्याचे कार्य काय असते ? हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. सत्ताधारी मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्यास विरोधी पक्षनेत्याने त्यावर आवाज उठविणे गरजेचे असते. मात्र येथे तर ‘आपण दोघे भाऊ मिळून सर्व खाऊ’ असाच प्रकार झालेला आहे. ब्रिटीशकालीन पाइपलाईनची भरदिवसा चोरी करण्याप्रयत्न सुनील महाजन याची मजल जाणे जळगावकरांसाठी दुर्दैवी आहे.

जळगाव शहरातील पाईपलाईन चोरी प्रकरणामुळे भर थंडीत हे प्रकरण सध्या चांगलेच तप्त होत आहे. यामध्ये सहा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला; मात्र यात राजकीय मोठा मासा देखील गळाला लागला आहे. तो मासा जळगाव शहराच्या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी महापौर जयश्री महाजन यांचे पती सुनील महाजन असून अद्यापही ते मोकाट आहेत. शहराला कधी काळी पाणी पुरवठा करणाऱ्या गिरणा पंपिंग प्लांटवरून येणारी जुनी पाईपलाइन जेसीबीद्वारे चारी खोदून चोरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने लोकप्रतिनिधी किती खालच्या पातळीपर्यंत जात आहेत हे यावरुन अधोरेखित होत आहे. याप्रकरणी मनपा अभियंता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना न्यायालयाकडून जामीनही  मिळाला आहे. माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन हे अद्यापही मोकाट असल्याने त्यांचा या प्रकरणात मोठा सहभाग आहे हे सिद्ध करीत आहेत. त्यांनी अटकपूर्वक जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

गिरणा पंपिंगजवळ आर्यन पार्कच्या समोर असलेली जुनी पाण्याची लोखंडी पाईप लाईन कोणीतरी जेसीबी वाहनाच्या साह्याय्याने चारी खोदुन काढत असल्याचे प्रारंभी समोर आले. एक पिवळ्या रंगाचे जेसीबीवरील दोन इसम हे जेसीबीच्या साहाय्याने जुन्या पाईप लाईन मधील बीडचे पाईप काढताना मिळून आले. जेसीबी चालक नरेंद्र निवृत्ती पाणगडे, व रवण चव्हाण अशी त्यांची नावे समोर आल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अधिक तपास केला असता माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन हे या प्रकरणाचे मास्टर माईंड असल्याचे समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ज्या व्यक्तीने मनपाच्या भ्रष्ट कारभारावर वचक ठेवणे अपेक्षित होत तोच चोर निघणे किती दुर्दैवी आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काही पथ्य पाळणे अपेक्षित असतांनाही सुनील महाजनने ते पथ्य पायदळी तुडविले आहेत. महाजन कुटुंबिय राजकारणात सक्रिय असून त्यांच्याकडून शहराच्या काही विकासात्मक अपेक्षा देखील आहेत.

सुनील महाजन यांच्या पत्नी जळगाव शहराच्या महापौर राहिल्या आहेत. त्यांचे पती देखील शिवसेना ठाकरे गटाचे महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते म्हणून कार्यरत होते. आता नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून जयश्री महाजन यांनी जळगाव शहरात उमेदवारी केली. त्यांचेच पती सुनील महाजन हे आता पाईपलाईन चोरीच्या प्रकरणात अडकणे हे राजकीय क्षेत्राला काळामा फासणारे आहे. सुनील महाजन हे विरोधी पक्षनेते असतांना अतिशय निष्क्रिय म्हणून ठरले आहेत. एकाही विषयावर त्यांनी विरोध दर्शविला नाही. पत्नी महापौर असल्याने ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ अशीच भूमिका घेत त्यांनी जळगावकरांची शुद्ध फसवणूक केली आहे. एकंदरीत काय तर महापालिकेच्या चाव्या ह्या चोराच्या ताब्यात राहणे किती वाईट आहे. हे प्रकरण न्यायालयाच्या दरबारात असून तेथे काय होईल हे लवकरच स्पष्ट होईल मात्र सुज्ञ जनतेनेच अशा लोकप्रतिनिधींना नाकारणे हेच आपले कर्तव्य ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.