लोकशाही संपादकीय लेख
सध्या जळगाव महापालिकेतील प्रशासन विविध कारणांनी गाजते आहे. चांगल्या अर्थाने गाजत असेल तर ते समजू शकतो, परंतु कुप्रसिद्धीमुळे गाजते, ही सर्वात वाईट बाब म्हणावी लागेल. सहाय्यक नगर रचना अधिकारी मनोज वडनेरे यांना १५ हजाराची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. त्यांना अटक झाली. दोन दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली. एसीबीने त्यांचे जबाब घेतले तेव्हा, “आयुक्तांना पैसे द्यावे लागतात म्हणून आम्ही पैसे घेतो..” अशी धक्कादायक माहिती वडनेरे यांनी दिली. त्यामुळे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची तीन दिवस सलग एसीबीने चौकशी केली. त्याचा तपशील अद्याप कळू शकला नाही. तोच नगररचना विभागातील सहाय्यक संचालक तायडे यांचा पदभार काढून घेऊन दणका दिला गेला. अशा पद्धतीने महापालिका प्रशासनामध्ये खळबळ जनक प्रकार एकापाठोपाठ घडत आहेत. महापालिका महापालिकेत आणखी एक सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांनी पत्रकाराचा कॅमेरा हिसकावून घेऊन त्यातले मेमरी कार्ड काढून घेतले.
पत्रकार विक्रम कापडणे यांना सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून गणेश चाटेविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. हेच सहाय्यक आयुक्त गणेश चाटे हे जळगाव महापालिका निवडणूक लागल्यानंतर जळगाव मधून बदली टाळण्यासाठी जळगावचे रहिवासी असताना बीड जिल्ह्यातील रहिवासी असल्याचा पत्ता शासनाकडे सादर केला. प्रकरणी सामाजिक तथा आरटीआय कार्यकर्ता यांनी निवडणूक आयोगाकडे दीड महिन्यांपूर्वी चौकशी करण्याच्या मागणीचे पत्र दिले आहे. अशा प्रकारे सध्या जळगाव महानगरपालिका प्रशासन कुप्रसिद्धीच्या भोवऱ्यात सापडले आहे. महापालिका प्रशासनाला घरघर लागल्याचे कारण म्हणजे महापालिका आयुक्त अर्थात प्रशासक ज्ञानेश्वर ढेरे हे कारणीभूत आहेत, असे म्हणणे गैर होणार नाही. एखाद्या टीमचा कॅप्टन जर प्रशासनात स्ट्रिक्ट असेल तर त्याच्या हाताखालील अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांकडून वाईट वागण्याची बिशाद होणार नाही. आमच्या कॅप्टनला पैसे द्यावे लागतात म्हणून लोकांकडून आम्ही पैसे घेतो असे बिंदिकत सांगू शकतात, याचा दोष आयुक्तांचा द्यावा लागेल. सहाय्यक नगर रचना कारांनी घेतलेली लाच, सहाय्यक संचालक तायडे यांना पदभार मुक्त करणे आणि सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांचे विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल होणे या सर्व बाबींमुळे महापालिका प्रशासनावर जोरदार टीका होते आहे. शहरातील जनतेला नागरी सुविधा मिळाव्यात, महापालिकेशी संबंधित त्यांची कामे नियमितपणे व्हावीत, शहरातील विकास कामे गतिशीलतेने व्हावीत, यासाठी महापालिका प्रशासन असते. त्या ऐवजी स्वतःच्या स्वार्थ साधण्यासाठी प्रशासनाचा उपयोग होत असेल तर त्यांच्यावर कोणाचा वचकच नाही असे म्हणावे का?
अधिकाऱ्यांकडे अधिकाऱ्यांचे लाच प्रकरण गाजत असताना सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांचे प्रकरण आ वासून उभे राहते. महापालिकेतील पारदर्शक कारभाराचे तसेच जनहिताच्या दृष्टीने होणाऱ्या कामांचे चित्रीकरण करणे, हे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार योग्य असताना सहाय्यक आयुक्त गणेश साठे यांना पत्रकाराने फोटो काढण्याचा एवढा राग का यावा? हे मात्र कळत नाही. जळगाव महापालिकेतील लेखा विभागाच्या समोर पत्रकार विक्रम कापडणे यांनी फोटो काढत असताना तिथे जाऊन त्या पत्रकाराचा कॅमेरा हिसकावून घेतल्याचे कारण काय? सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांना पत्रकार विक्रम कापडणे विषयी आयुक्तांकडे तक्रार करायला हवी होती. परंतु तसे न करता महापालिका ही जनतेची कामे करण्याचे कार्यालय असताना स्वतःच्या मालकीची खाजगी मालमत्ता समजून पत्रकार विक्रम कापणे यांच्या हातातील कॅमेरा हिसकावून घेत त्यातील मेमरी कार्ड काढण्याचा अधिकार त्यांना आहे काय? याचा अर्थ ‘दाल मे कुछ तो काला है’ असाच होतो.
गणेश चाटे यांच्या मनात भीती निर्माण झाल्याने त्यांनी हे कृत्य केले काय? याबाबतीत उच्च न्यायालयाने वेळोवेळी पत्रकारांच्या संदर्भात सार्वजनिक ठिकाणांचे फोटो काढण्याच्या संदर्भात जे निर्देश दिले आहेत, त्याबाबत सहाय्यक आयुक्त गणेश साठे यांना माहिती नाही काय? कारण एका सामाजिक तथा आरटीआय कार्यकर्त्यांनी याबाबत सहाय्यक आयुक्त चाटे यांना विचारले असता ते निरुत्तर झाले. त्यामुळे गणेश चाटे यांचा याबाबतीत अभ्यास कमी पडतो. तसेच महापालिका म्हणजे आपली खाजगी मालमत्ता असेच ते समजतात. अन्यथा गणेश चाटे यांनी अशा प्रकारच्या गंभीर चुका केल्याच नसत्या. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जातो. माध्यमांच्या माध्यमातून आपली पोलखोल होईल, या भीतीपोटी त्यांनी हे कृत्य केले असावे. याबाबतीत गणेश चाटे यांची पोलीस स्तरावर जी चौकशी व्हायची ती होईल; परंतु आयुक्तांनी याबाबतीत तातडीने चौकशी करून योग्य तो निर्णय घ्यावा. तसेच आपली जगामधून दुसरीकडे बदली होऊ नये म्हणून जळगावचे रहिवासी असताना बीड जिल्ह्याचे रहिवासी म्हणून जो पत्ता दिला, ही सुद्धा बाब अत्यंत गंभीर असून त्याचीही चौकशी होणे आवश्यक आहे…!