ना. पाटील महाजनांकडून खडसेंचा सुनियोजित गेम..!

0

लोकशाही संपादकीय लेख

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (Jalgaon Jilha Dudh Sangh Election) प्रतिष्ठेच्या निवडणुकीत शिंदे भाजप गटाचे (Shinde- BJP Group) ना. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि ना. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या शेतकरी विकास पॅनलने (Shetkari Vikas Panel) बाजी मारली. दूध संघात गेली सात वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) गटाचा दारुण पराभव झाला. दूध संघात विकास केला, संघाला तोट्यातून नफ्यात आणले, डबघाईस गेलेल्या संघाला ऊर्जितावस्था प्राप्त केली, संघात 100 कोटींची गुंतवणूक केली, म्हणून खडसे गटाच्या महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलला मतदार निवडून देतील असा विश्वास एकनाथ खडसेंना होता. तथापि जिल्ह्यात फक्त 441 मतदार असलेल्या मतदारांनी आपल्या मताचा कौल गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्या बाजूने दिला. निवडणूक जाहीर झाल्यावर सुरुवातीला सहकारात राजकारण असायला नको, म्हणून सर्वपक्षीय पॅनल तयार करून निवडणूक बिनविरोध करण्याचे दोन्ही गटाकडून नाटक करण्यात आले.

खडसे परिवाराला वगळून सर्वपक्षीय पॅनल करण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली. ही बाब चूक असल्याचे दोन्ही गटाला माहिती होते. शिंदे भाजप गटाने ही खेळी केली. त्यात दूध संघ निवडणुकीची नियमावली ऐनवेळी बदलली गेली. तालुक्याचे बंधन काढून जिल्हा मतदार संघ करण्यात आला आणि ते शिंदे भाजप गटाच्या पथ्यावर पडले. या बदललेल्या नियमावलीमुळे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण (MLA Mangesh Chavan ) हे मुक्ताईनगर मतदारसंघातून मंदाकिनी खडसेंच्या (Mandakini Khadse) विरोधात निवडणूक लढवू शकले.

जिल्हाभरात फक्त 441 मतदार असल्याचा फायदा शिंदे भाजप गटाला झाला. मतदारांना वश करण्यासाठी विरोधकांनी खोके रिकामे केले, असे आता पराभवानंतर एकनाथ खडसे आरोप करीत असले, तरी त्यांच्या पॅनलकडून उमेदवारांनी ही करामत केली नाही, असे म्हणता येणार नाही. महिला राखीव मतदार संघाकडून जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या पत्नी विजयी झाल्या, तर अमळनेर मधून आमदार अनिल भाईदास पाटील (MLA Anil Bhaidas Patil) हे त्यांचे प्रतिस्पर्धी स्मिता वाघ (Smita Vagh) यांचा पराभव करून विजयी झाले.

गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) आणि अनिल भाईदास पाटील यांनी स्वतःच्या ताकदीवर ही निवडणूक जिंकली. त्यात खडसे पॅनलचा वाटा विशेष नाही म्हटले तरी वावगे ठरणार नाही. एकंदरीत एकनाथराव खडसे यांचा दूध संघ निवडणुकीत मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांनी सुनियोजित गेम केला.

चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना खडसेंच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करण्यासाठी खास उपयोग करून घेतला गेला. कसलाही अनुभव नसलेल्या मंगेश चव्हाण यांनी खडसेंच्या विरोधात टीकाटिप्पणी करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यातच ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेला दोन्ही पॅनलच्या उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाले. त्याच दिवशी महाराष्ट्रातील सहकार संघाच्या संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली गेली. त्यात जळगाव जिल्हा दूध संघाचाही समावेश होता. परंतु दोन दिवसात फक्त जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुकीची स्थगितीही उठवली गेली. त्याचाही फटका खडसे गटाच्या पॅनलला बसला, असे म्हणता येईल. म्हणजे ‘ज्याच्या हाती ससा तो पारधी’, या म्हणीप्रमाणे जे सत्तेत आहेत त्या शिंदे भाजप गटाने दूध संघ निवडणुकीच्या संदर्भात आपल्या हाती असलेल्या सत्तेचा वापर केला. हेच आधी जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंनी सत्तेचे कार्ड करून गिरीश महाजनांना जेरीस आणले होते. परिणामी जे पेरले तेच उगवले, हे मंत्री गुलाबराव पाटील म्हणतात ते उगाच नव्हे. कारण बँकेच्या निवडणुकीत गुलाबराव पाटील, एकनाथराव खडसे एकत्र होते. त्यावेळी परिस्थिती पाहून गिरीश महाजन यांनी भाजपतर्फे जिल्हा बँक निवडणुकीतून माघार घेतली होती. त्या वेळेचा वचपा आता दूध संघात गिरीश महाजन यांनी काढला. यावेळी गिरीश महाजन समवेत स्वतः पालकमंत्री गुलाबराव पाटील हे होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडून सहकारची निवडणूक लढवणार नाही, अशा बँक निवडणुकीच्या वेळी केलेली घोषणा फोल ठरली. स्वतः जळगाव तालुका मतदार संघात निवडणूक लढवली आणि त्यांचा दणदणीत विजय झाला. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी बँक निवडणुकीच्या वेळी निवडणुकीतून माघार घेतल्याने जामनेर मधून त्यांच्या विरोधातील खडसे गटाचा उमेदवार बिनविरोध विजयी झाला होता. एकंदरीत जळगाव जिल्हा सहकारी दूध संघात एकनाथ खडसे यांचा ‘सुनियोजित गेम’ दोन्ही मंत्र्यांनी केला आणि दूध संघ त्यांच्या बालेकिल्ल्यातून हिसकावून घेतला. जळगाव जिल्हा आगामी प्रगतीसाठी शिंदे भाजप गटातर्फे विशेषतः मंत्री गुलाबराव पाटील आणि ना. गिरीश महाजन यांची कसोटी लागणार आहे. मात्र दूध संघाच्या प्रशासनात ‘विशेष रस’ घेणारे तरुण आमदार मंगेश चव्हाण यांची ही जबाबदारी वाढणार आहे. कारण 34 दिवसांच्या संघावरील प्रशासकीय कारकीर्दीत प्रमुख प्रशासक म्हणून संघावर अनेक आरोप केले आहेत.

बी ग्रेड तूप, लोण्याची चोरी, संघातील भ्रष्टाचार उघडकीस आणून संघाच्या कार्यकारी संचालकांसह काही अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक झाली. संघात भ्रष्टाचार झाला नाही, संघाचा कारभार अत्यंत पारदर्शक असल्याचे खडसे सांगत असले, तरी पोलिसी कारवाईमुळे हे संघाच्या पारदर्शक प्रशासनासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरले. त्याचाही परिणाम दूध संघाच्या निवडणुकीवर झाला, असे म्हणता येईल. ‘सबसे बडा रुपय्या’ हे धोरण या निवडणुकीत मोठी भूमिका बजावून आहे, त्यात शंका नाही. परंतु संघावर आपले वर्चस्व असल्याचा दावा करणारे एकनाथराव खडसे यांचा मात्र सुनियोजित गेम केला गेला, एवढे मात्र निश्चित…!

Leave A Reply

Your email address will not be published.