बापरे ! जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थिनींची रॅगींग

0

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. स्त्रीरोग विभागात पदव्युत्तर (एम.डी.) चे प्रथम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या ज्युनिअर विद्यार्थीनींवर सिनिअर विद्यार्थीनींकडून रॅगींग होत असल्याच्या घटनेने खळबळ उडाली असून गुरुवार दि. २६ रोजी शासकीय महाविद्यालयातील ॲन्टी रॅगींग समितीकडून चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महाराष्ट्रासह अन्य राज्यातील विद्यार्थीनी एमडी पदव्युत्तराचे शिक्षण घेत आहेत. स्त्रीरोग विभागात प्रथम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थीनींची त्यांना सिनीयर असलेल्या दुसऱ्या वर्षातील विद्यार्थीनीकडून रॅगींग केली जात असून अनेक दिवसापासून या पीडित विद्यार्थीनी सहन करत होत्या.

सिनीयर विद्यार्थीनींकडून अधिकच छळ होऊ लागल्याने अनेक ज्युनिअर विद्यार्थीनी भयभीत झाल्या. तर काही प्रथम वर्षाला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींनी याविरोधात आवाज उठविण्याचा निर्धार करत ॲन्टी रँगींग हेल्पलाईनवर बुधवार, २५ रोजी तक्रार दिली. या तक्रारीची गंभीर दखल घेत गुरुवार, २६ रोजी वैद्यकीय महाविद्यालयाच्या डिन कार्यालयाला अँन्टी रँगींग समितीचा संदेश आला. रँगींग संदर्भात तक्रार प्राप्त झाली असून समितीमार्फत चौकशी करुन अहवाल त्वरीत सादर करावा, असे त्यात म्हटले होते.

त्यानुसार महाविद्यालयातील ॲन्टी रॅगींगच्या १५ सदस्यीय समितीकडून याप्रकरणी चौकशीला सुरुवात करण्यात आली. या समितीमध्ये महाविद्यालयीन शिक्षकांसह, तहसीलदार, पोलीस अधिकारी, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांचा समावेश आहे. तक्रारदारांचे जबाब नोंदविल्यानंतर ज्यांच्या विरोधात तक्रार आहे, त्यांचे जबाब समिती नोंदविणार आहे. त्यानंतर चौकशी माहितीचा हा अहवाल वरीष्ठाकडे सादर केला जाणार असल्याचे चौकशी समितीमधील सदस्यांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.