जळगाव महापालिका मतदानासाठी सज्ज
१४५ इमारतींमध्ये ५१६ मतदान केंद्रे; मतमोजणी एमआयडीसीतील वखार महामंडळात
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारीचा वेग वाढवला असून, शहरातील १४५ इमारतींमध्ये एकूण ५१६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी ५३८ कंट्रोल युनिट व १,१३६ बॅलेट युनिट उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
महापालिका मुख्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे तसेच सहायक आयुक्त उदय पाटील उपस्थित होते. यावेळी आयुक्त ढेरे यांनी मतमोजणी होणाऱ्या एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदाम परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.
मतमोजणीच्या ठिकाणी कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी आरोग्य विभागामार्फत संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. मतदानाच्या आधी याच ठिकाणी मतदान साहित्याचे वाटप करण्यात येणार असून, मतदान पूर्ण झाल्यानंतर सर्व ईव्हीएम यंत्रे सील करून टॅगिंगसह सुरक्षितरित्या याच ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासन सज्ज
मागील महापालिका निवडणुकीत जळगाव शहरात सुमारे ५४ टक्के मतदान झाले होते. मात्र, यंदा मतदानाची टक्केवारी ६० टक्क्यांपेक्षा अधिक नेण्यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. यासाठी मतदार जनजागृती मोहिमा, नागरिकांशी थेट संवाद, तसेच विविध माध्यमांतून मतदानाबाबत आवाहन करण्यात येणार आहे. नागरिकांनी निर्भयपणे व उत्साहाने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
प्रभागनिहाय जबाबदाऱ्या निश्चित
निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पडावी यासाठी शहराची प्रभागनिहाय विभागणी करण्यात आली असून, पाच मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नियुक्त्या आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी बुधवारी अधिकृतपणे जाहीर केल्या आहेत. संपूर्ण निवडणूक यंत्रणा काटेकोर नियोजनाखाली कार्यरत राहणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

