जळगाव शहराचे रस्ते आता होणार चकाचक !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या साडेतीन वर्षापासून जळगाव शहरातील रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. त्याआधी सुध्दा शहरातील रस्ते खास असे नव्हतेच. परंतु साडेतीन वर्षापासून अमृत पाणीपुरवठा योजना आणि भुयारी गटारी योजनेसाठी शहरातील रस्त्यांची खोदून – खोदून चाळण झाली. रस्त्यात खड्डे आहेत की, खड्ड्यात रस्ते आहे हे सांगणे अवघड होते. पावसाळ्यात रस्त्यातील खड्डयात साचलेल्या पाण्यामुळे दुचाकीस्वारांना अपघातांना तोंड द्यावे लागते. तरुण उद्योजकासह खड्ड्यांनी अनेकांचा बळी घेतला. रस्ते दुरूस्तीला निधी तर उपलब्ध नव्हताच परंतु डागडुजी सुध्दा करणे शक्य नव्हते. कारण अमृत योजना अन्‌ भुयारी गटारीचे खोदकाम अजूनही रस्त्याच्या कामाचे खोदकाम सुरूच आहे. त्यातच 42 कोटींच्या रस्ते कामांना शासनाने स्थगिती दिल्यामुळे महापालिकेचे हात बांधलेले होते.

आता शासनाने 42 कोटी मंजूर स्थगिती उठविल्याने एक आनंदाची बातमी जळगाव वासियांना मिळाली आहे. आता महापालिकेच्या वतीने कसलीही हयगय न करता प्रमुख रस्त्यांसाठी निविदा मागविली पाहिजे. तातडीने निविदा मंजूर करून रस्त्यांच्या कामाला सुरूवात केली पाहिजे. हे काम गतीने तर झालेच पाहिजे. परंतु रस्त्याच्या कामाची गुणवत्ता राखली गेली पाहिजे. या कामात हयगय केली गेली की, पावसाळा सुरू होईल अणि पावसामुळे रस्त्याची कामे अडून बसायला नको. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा आदर्श घ्यावा. देशात महामार्गाची कामे जोरात होताहेत. दररोज 35 किलोमीटर इतके सरासरी रस्ते होताहेत. हा आदर्श घेऊन महापालिकेने पावसाळा सुरू होण्याआधी शहरातील रस्ते तयार झाले पाहिजेत. म्हणजे येत्या पावसाळ्यात जळगावकरांना खड्डेमुक्त रस्ते झाले पाहिजेत.

शहरातील मुख्य रस्त्यांबरोबरच शहराबाहेर ज्या नवीन कॉलनी झालेल्या आहेत. त्या कॉलन्यांमधील कच्चे रस्ते खडीकरण चांगले केले तर त्या रस्त्यावर चिखल होणार नाही. अन्यथा कच्चा मातीच्या रस्त्यावरून मोटारसायकली, सायकली चालवणे कठीण जाणार आहे. त्याचबरोबर पायी चालणे सुध्दा कठीण होणार आहे. त्याकरिता महापालिकेने नवीन कॉलनी मधील रस्त्यांकडे सुध्दा लक्ष द्यायला हवे.

शहरातील महामार्गावर विद्युत रोषणाई आवश्‍यक

जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे अखेर खोटेनगरपासून कालिंकामाता पर्यंतचे 8 कि.मी.चे चौपदरीकरण झाले. महामार्गाच्या मध्यभागात विजेचे पोल उभे करून त्यावर रोषणाई करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसुध्दा मिळालेली आहे. आता या महामार्गावर विजेचे दिवे नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनधारकांना विशेषत: दुचाकीस्वारांना त्रास होतो. वास्तविक विद्युत रोषणाईचे काम लागलीच व्हायला हवे होते. किंबहुना महामार्ग चौपदरीकरणाचे कंत्राटदारांकडेच याचेही काम द्यायला हवे होते. परंतु तसेच झाले नाही.

आता महामार्गाचे काम पूर्ण झाल्यावर विजेच्या पुलासाठी मध्यभागी दुभाजकांच्या ठिकाणी पुन्हा खड्डे खोदावे लागणार आहे. हे काम गतीने केले गेले तर ठिक अन्यथा पुन्हा वाहतुकीस अडथळा निर्माण होणार. महापालिकेच्या प्रशासनाने हे लक्ष ठेवून करणे आवश्‍यक होते. परंतु महापालिका प्रशासन सुस्त आहे आणि आमचे लोकप्रतिनिधी, नगरसेवक त्याहून सुस्त म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे वरातीमागून घोडे म्हणतात तशातला प्रकार आहे. शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाला होणारा विलंब हा त्याचा ज्वलंत पुरावा आहे. अजून पुलाचे काम पूर्ण होणे बाकी आहे. त्याआधी त्या पुलावर विजेच्या रोषणाईचे काम महापालिकेने करणे आवश्‍यक आहे. अन्यथा पुलावरून वाहतूक सुरु होईल. त्यानंतर या पुलावर विद्युत रोषणाईचे काम सुरू होईल.

जळगाव शहर तसेच जिल्ह्यामध्ये विकास कामांची अशीच वाताहात होत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या तरसोद ते चिखली पर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम ज्या गतीने झाले तशी इतर कामे होत नाहीत. तरसोद ते फागणे पर्यंतच्या चौपदरीकरणाच्या ठेकेदाराला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तंबी दिली. येत्या डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण झाले पाहिजे, असा आदेश दिला, तशा पध्दतीने कामे झाली तर विकासकामे गतीने पूर्ण होतात अन्यथा पडून राहतात हा अनुभव आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.