भाजीपाला विक्रेत्याला बेदम मारहाण; तीन जणांवर गुन्हा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील कासमवाडी येथील आठवडे बाजारात भाजीपाल्याचे दुकान लावण्यावरून भाजीपाला विक्रेत्याला तीन जणांकडून बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दर शनिवारी शहरातील कासमवाडी आठवडे बाजार भरतो. या आठवडे बाजारात उर्दू शाळेसमोर प्रशांत सोमनाथ बडगुजर (वय ३६, रा. इंदिरानगर महादेव मंदिराजवळ शिरसोली) हा तरुण भाजीपाला विक्री करण्याचे दुकान लावतो. शनिवारी १२ मार्च रोजी देखील त्याने भाजीपाला विक्रीचे दुकान लावलेले होते.

दरम्यान सायंकाळी ६ वाजता दुकान लावण्याच्या कारणावरून आणि भाजीपाल्याच्या उधारीचे पैसे मागण्यावरून भैय्या संतोष धोबी उर्फ टेलर, गणेश समाधान मराठे, रेखाबाई समाधान मराठे सर्व रा. स्मशानभूमीजवळ मेहरुण यांनी प्रशांत बडगुजर याला शिवीगाळ करून मारहाण केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

प्रशांतच्या डोक्यावर पाठीवर यातील एकाने लोखंडी दांड्याने मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याप्रकरणी सोमवारी १४ मार्च रोजी दुपारी प्रशांत बडगुजर यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी भैय्या संतोष धोबी, गणेश समाधान मराठे, रेखाबाई समाधान मराठे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.