जळगावमध्ये चॉपरसह फिरणाऱ्या तिघांना अटक
जळगाव: शहरातील गणेश कॉलनी परिसरात चॉपरसह संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तीन युवकांना जिल्हापेठ पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी अटक केली. त्यापैकी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अल्पवयीन मुलाला समज देऊन पालकांच्या ताब्यात सोडण्यात आले आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. गणेश कॉलनीत काही युवक बेकायदेशीररीत्या हत्यारे बाळगून फिरत असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली. पोलिसांना पाहताच तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना ताब्यात घेतल्यानंतर झडतीत त्यांच्याकडे धारदार चॉपर आढळून आला.
संबंधित युवकांविरुद्ध शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास जिल्हापेठ पोलीस करत आहेत.