जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
आग्रा येथील पथयाबाद येथून आलेल्या शाहीद मुन्ना कुरेशी याला तीन जणांनी दुचाकीवर बसवून त्याला गोदावरी महाविद्यालयाजवळ घेवून गेले. त्याला मारहाण करीत त्याच्याजवळील 2 हजार रुपये हिसकावून घेतल्याची घटना दि. 1 फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. गुन्हा दाखल होताच, शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने तपासचक्रे फिरवित तिघ संशयितांच्या मुसक्या आवळल्या.
जळगाव येथून धुळे जाण्यासाठी शहीद मुन्ना कुरेशी (रा. पथियाबाद, आग्रा) येथील व्यापारी दि. 1 फेब्रुवारी रोजी जळगाव रेल्वे स्थानकावर उतरले. स्टेशन परिसरात असलेल्या टपरीवर पान खाण्यासाठी गेले असता, त्यावेळी तेथे उभ्या असलेल्या तीन जणांनी चौकशी करुन त्यांच्या मोबाईलमध्ये असलेले गार्इंचे फोटो दाखविले. ते फोटो पाहून तु गायी कापत असशील, तुला खोट्या केसमध्ये अडकवू असे म्हणत त्याला दुचाकीवर बसवून गोदावरी कॉलेजकडे घेवून गेले. त्या तिघांनी व्यापारी कुरेशीकडे 20 हजारांची मागणी केली. त्यावेळी कुरेशी यांनी त्यांच्या वडीलांकडून दोन हजार रुपये कॉलेज येथील पे टीएमवर मागविले. त्या तिघांनी ते जबरीने काढून घेत कुरेशी याला थोड्या अंतरावर सोडून देवून तेथून पसार झाले होते.
जबरीने पैसे काढून घेतल्यानंतर पळून जात असतांना त्या तिघांनी कुरेशी यांना ‘पोलीस मे कंप्लेंट दिया तो याद रख’ असा दम दिला होता. त्यानंतर कुरेशी यांनी तात्काळ शहर पोलीसात धाव घेत आपबिती कथन केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने नेत्रमचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. यावेळी व्यापाऱ्याला घेवून जाणाऱ्या दुचाकीवरुन मनोज आधार सोनवणे (वय 23, रा. मोहन टॉकीजवळ, असोदारोड) हा दिसून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केल्यानंतर त्याने यश रविंद्र पाटील (वय 21, रा. आव्हाणे, ता. जळगाव) व महेंद्र पांडुरंग पाटील (वय 28, रा. आमोदा, ह. मु. वाटीका आश्रम) या साथीदारांच्या मदतीने केल्याचे सांगितले. त्यांच्या देखील घरुन पोलिसांनी मुसक्या आवळून मुद्देमाल हस्तगत केला आहे.
यांचा होता पथकात समावेश
ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सपोनि रामचंद्र शिकारे, सफौ सुनिल पाटील, पोहेकॉ संतोष खवले, उमेश भांडारकर, सतिष पाटील, भास्कर ठाकरे, योगेश पाटील, किशोर निकुंभ, चंदू सोनवणे, अमोल ठाकूर, राहुल पांचाळ, प्रणय पवार यांच्या पथकाने केली.