धाकच नाही.. तुकारामवाडीत गुंडांची दबंगगिरी

घरांवर दगडफेक अन् वाहनांची तोडफोड, तब्बल १० ते १३ जणांवर गुन्हे दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे, जणू काही कायद्याचा धाकच राहिलेला नाही. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील तुकारामवाडी परिसरात मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास काही गुंडांनी गोंधळ घालत काही घरांवर दगडफेक केली, दमदाटी केली आणि वाहनांची तोडफोड करून गंभीर नुकसान केले. सुरेश ओतारी यांच्या खून प्रकरणातून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शारदा सुकलाल ठाकुर (वय ४०, रा. तुकाराम वाडी) यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. संशयित आरोपी स्वप्निल उर्फ गोलू धर्मराज ठाकुर, निशांत प्रताप चौधरी, अरुण उर्फ टीनू भिमराव गोसावी, मुन्ना पहिलवान, पारस सोनवणे, बेंडा अज्या, गौरव मिस्तरी आणि ५-६ अज्ञात तरुणांनी मिळून हा हल्ला केला असल्याचे फिर्यादीत नमुद आहे. शारदा ठाकूर हे घरात पती व दोन मुलींसोबत घरात झोपलेल्या असताना अचानक दरवाज्यावर लाठ्या, काठ्या आणि दगडांचा मारा सुरू झाला. दरवाजा अर्धवट उघडल्यावर समोर गोलू ठाकुर व त्याचे साथीदार उभे होते. त्यांनी अश्लील शिवीगाळ करत दमदाटी केली.

दरम्यान या गुंडांनी पुढे कल्पना दिलीप बाविस्कर यांच्या घरात घुसून कल्पना आणि त्यांच्या सून प्रियंका प्रफुल बाविस्कर यांना शिवीगाळ केली आणि त्यांच्या दुचाकीचे नुकसान केले. यानंतर रुपाली विजय पवार यांच्या घराजवळील कूलर खाली फेकून फोडण्यात आला. वॉशिंग मशीन आणि पाण्याच्या टाक्याही फोडण्यात आल्या. तसेच सम्राट कॉलनीतील सविता भगवान महाजन यांच्या घराच्या खिडकीची काच फोडून पल्सर मोटरसायकल व सायकलवरही दगडफेक करण्यात आली. या गंभीर प्रकारामुळे तुकारामवाडीतील परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.