मतांसाठी काहीही.. उमेदवाराने स्वत:च्याच घरावर घडवला गोळीबार

जळगावात घडले राजकीय नाट्य

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

राजकारणात कोण केव्हा काय करणार याचा नेम नाही. नुकताच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून राज्यात सत्तास्थापनाही झाली. यंदा विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. निवडणुकीच्या मतदानापूर्वी म्हणजेच 20 नोव्हेंबरच्या  दोन दिवस आधीच जळगावात एका अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार झाल्याने खळबळ माजली होती. आता या घटनेचा खुलासा झाला आहे.

विधानसभा निवडणुकीत निवडून येता यावं, निवडणुकीमध्ये लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी त्या उमेदवारानेच आपल्या घरावर गोळीबार करून घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी एकूण 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावमधील अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्यासह त्यांच्या 2 मुलांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता 10 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र या गुन्ह्यात सहभागी असलेले दोन जण अद्याप फरार आहेत. तसेच गुह्यातील बंदुकीसह इतर मुद्देमाल जप्त करणे बाकी आहे. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

 

नेमकं प्रकरण काय ?

अहमद हुसेन शेख (वय 51) हे जळगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत होते. 20 नोव्हेंबर रोजी राज्यभरात मतदान झालं तर 23 तारखेला मतमोजणी होऊन निकाल लागला. मात्र मतदानाच्या 2 दिवस आधी 18 नोव्हेंबर रोजी पहाटे चारच्या सुमारा अहमद शेख यांच्या घरावर गोळीबार झाला होता. दोन गोळ्या लागून त्यांच्या घराच्या खिडकीची काच फुटली होती तर एक गोळी त्यांच्या घराच्या भिंतीवर लागली होती. यामुळे प्रचंड खळबळ माजली.

याप्रकरणी जळगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करत गोळीबार करणाऱ्या आरोपींच्या शोधासाठी शोधमोहिम राबवली. सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरु केला. त्यावेळी तक्रारदाराच्या नातेवाईकाच त्यात सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांचा मेव्हणा आणि आणखी एका साधीदार याने मालेगावमधून जळगावात येऊन शेख यांच्या घरावर गोळीबार केला आणि ते परत निघून गेल्याचे तपासात उघड झाले.

पोलिसांनी अधिक तपास केला असता निवडणुकीस उभे असलेले उमेदवार अहमद शेख यांनीच त्यांच्या स्वत:च्या घरावर गोळीबार करवून आणल्याचे समोर आले. निवडणुकीत सहानुभूती मिळविण्यासाठी अहमद हुसेन शेख यांनी घरावर गोळीबार करवून घेण्याचे कृत्य केल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.