वृद्धेच्या घरात चोरट्यांचा डल्ला ! ७२ हजारांचा ऐवज लंपास

मुलीकडे गेल्याची संधी साधली

0

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क

जळगाव शहरातील ढाके कॉलनी येथे राहणाऱ्या ७२ वर्षीय वृद्धेच्या घरातून चोरट्यांनी सोने, चांदीचे दागिने व तांबे, पितळीची भांडे असा ७२,५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, कमल गोपाल तेली (वय ७२) या ढाके कॉलनी येथे राहतात. त्या गेल्या महिनाभरापासून त्यांच्या सैनिक कॉलनीत राहणाऱ्या मुलीकडे गेल्या होत्या. त्यामुळे त्यांचे घर महिनाभरापासून बंद होते. हीच संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात लोखंडी पेटीत ठेवलेले ७२,५०० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व तांब्या पितळीची भांडी लंपास केली. २ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान ही घटना घडली.

इतकेच नव्हे तर चोरट्याने चोरी केल्यानंतर पहिल्या कुलपासारखेच दिसणारे कुलूप आणून दरवाजाला लावले. याप्रकरणी सोमवारी कमल तेली यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक राजेंद्र उगले हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.