जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढणार आहे.गेल्या आठवड्यात गायब झालेली थंडी या आठवड्याच्या अखेर परतली आहे. काल शुक्रवारी जळगावच्या तापमानात एकाच दिवसात मोठी घसरण झाल्याने रात्रीचा आणि सकाळच्या थंडीत वाढ झालीय.आज ४ जानेवारी रोजी पारा आणखी घसरला असून पुढील दोन दिवसांत पारा दोन ते तीन अंशांनी घसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे.
जळगावात गेल्या आठवड्यात अवकाळीच्या ढगाळ वातावरणामुळे रात्रीचे तापमान १९ अंशापर्यंत वाढले होते. यामुळे जळगावकरांना काहीशा उकाडा जाणवत होता. मात्र या आठवड्यापासून तापमानात सातत्याने घसरण होत असल्याचं दिसून आले. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी रात्रीचे तापमान १७ अंशापर्यंत होते. मात्र त्यात गेल्या पाच दिवसात मोठी घट झाली. शुक्रवारी जळगावचे किमान तापमान १०.४ अंशांवर आले. कोरड्या हवामानामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. या थंड वाऱ्यांमुळे थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे रात्रीच्या तापमानात एकाच रात्रीत ३ ते ४ अंशांची घट झाल्यामुळे रात्री आणि पहाटे थंडीचा कडाका जाणवत आहे. सोबतच काही भागात धुक्याची चादर परसली आहे.
मात्र दुसरीकडे किमान तापमानाचा पारा हळूहळू खाली घसरत असतानाच दुपारच्या वेळी उन्हाचा चटका थोड्याफार प्रमाणात जाणवत आहे. शुक्रवारी कमाल तापमानात वाढ होऊन ते ३०.४ अंशावर गेलं आहे. यामुळे दुपारी उन्हाचा चटका बसत आहे. आजपासून जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढणार आहे. आज ४ ते ९ जानेवारी दरम्यान थंडी वाढेल. यादरम्यान किमान तापमान ८ ते ११ डिग्री सेल्सिअस दरम्यान राहील तर कमाल तापमान २९ ते ३२ अंशांवर राहील. ६, ७ आणि ८ जानेवारी या तीन दिवसात किमान तापमान घसरेल असा अंदाज आहे.