लाचखोर मुख्याध्यापक ACB च्या जाळ्यात

शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव जिल्ह्यात लाच घेण्याचे प्रमाण वाढले आहे. जळगाव जिल्ह्यात मुख्याध्यापकास लाच घेताना रंगेहात पकडला गेला आहे. बळीराम सुभाष सोनवणे (वय 55) असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव असून ही घटना एरंडोल तालुक्यातील पिपळकोठा येथील जिल्हा परिषद शाळेत घडली. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदार हे प्राथमिक शाळा पिपळकोठे येथे शिक्षक या पदावर नेमणुकीस आहेत. तर बळीराम सुभाष सोनवणे (वय 55) हे मुख्याध्यापक आहेत. यातील संशयित आरोपी शिक्षण विस्तार अधिकारी जे.डी. पाटील यांनी गेल्या सोमवारी त्यांच्या शाळेचे इन्स्पेक्शन केले होते. दरम्यान शाळेचे इन्फेक्शन करत असताना शिक्षण विस्तार अधिकारी यांनी चांगला शेरा लिहावा म्हणून १० हजार रुपये मागितले आहेत, असे सांगून शाळेचे मुख्याध्यापक बळीराम सुभाष सोनवणे यांनी शाळेतील प्रत्येक शिक्षकाकडून १ हजार रुपये असे एकूण १० हजार रुपयाची मागणी केली.

दरम्यान यातील तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाला या संदर्भात तक्रार केली. सोमवारी लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून कारवाई करत शिक्षण विस्तार अधिकारी यांना पैसे देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून १ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. दरम्यान तक्रारदार यांनी १ हजार रुपये हे देत असताना लाच लुचपत पथकाने कारवाई करत मुख्याध्यापक बळीराम सोनवणे यांना रंगेहात पकडले. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी यांची फोनद्वारे पडताळणी केली असता त्यांनी २ हजार रुपये मिळाल्याबाबत विरोध दर्शवला नाही आणि नंतर कॉल करतो असे सांगून फोन ठेवला. दरम्यान या संदर्भात एरंडोल पोलीस ठाण्यात शाळेचे मुख्याध्यापक बळीराम सुभाष सोनवणे (वय ५५, रा. एरंडोल) आणि एरंडोल पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी जे.डी. पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पोलीस नाईक बाळू मराठे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने यांच्यासह पथकाने केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.