जळगावच्या महिला सरपंचही लाच घेतात तेव्हा..!

0

लोकशाही संपादकीय लेख 

बीड जिल्ह्यातील मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी गावातील पवनचक्की कंपनीकडून गुंडांनी खंडणी मागितली म्हणून त्याला विरोध केला. यात सदर गुंडांकडून दोन महिन्यांपूर्वी त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली. दोन महिने झाले संपूर्ण महाराष्ट्रात हे प्रकरण गाजते आहे. मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्रात जन आक्रोश मोर्चा निघत आहे. महाराष्ट्रातील सरपंच संघटनेने सुद्धा संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करून हत्यारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

स्वतःच्या मत्सजोग गावात पवनचक्की उद्योगाच्या माध्यमातून रोजगार मिळावा, गावचे उत्पन्न वाढावे म्हणून गुंडांशी सामना करून संतोष देशमुख यांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकला. त्यांची निर्घुण हत्या झाली, ते सरपंच देशमुख कुठे आणि गावातील व्यायाम शाळेसाठी सात लाख रुपये मंजूर रकमेतून बिल मंजूर करण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागणारे जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील मेहु या गावातील महिला सरपंच जिजाबाई गणेश पाटील या सरपंच कुठे? दोन्ही सरपंचांची तुलना केली तर एक सरपंच गावाच्या विकासासाठी आपले बलिदान देतो, तर मेहु गावच्या महिला सरपंच गावातील व्यायाम शाळेच्या बांधकामासाठी मंजूर झालेल्या सात लाखांपैकी ४० हजारांची लाच मागून स्वतःचा स्वार्थ साधतात.

महिलांच्या बाबतीत आपण नेहमी तुलना करतो. पुरुषांप्रती महिला प्रामाणिक असतात. कुठलेही काम त्या प्रामाणिकपणे करतात. म्हणूनच राजकारणात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी सुद्धा खास महिलांसाठी ३० टक्के जागा आरक्षित करण्यात आली आहे. गावाची ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका निवडणुकीत महिलांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. परंतु आमच्या पुरुष संस्कृतीचा अहंकार येथेही आडवा येतो. निर्णय प्रक्रियेत महिलांना स्वातंत्र्य देण्याऐवजी त्यांचे पती त्यांच्या निर्णय प्रक्रियेत खोडा घालतात. अशा तक्रारी सातत्याने येत असतात आणि या तक्रारीत तथ्य असल्याचे आता सिद्ध होऊ लागले आहे. मेहु गावातील व्यायामशाळा बांधकामासाठी सात लाख रुपयांची मंजुरी घेऊन ते बांधकाम धनश्री कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले.

२०१७ ते २०२२-२३ या कालावधीत सरपंच असलेल्या व्यक्तीच्या सरपंचपदाच्या काळात व्यायामशाळेला मंजुरी मिळाली. त्यानंतर २०२३ मध्ये जिजाबाई पाटील या सरपंच झाल्या. त्यांच्या काळात शासनाकडून सात लाख रुपये मंजूर झाले. पहिले चार लाखांचा चेक सदर कंपनीत दिला गेला. दुसरा तीन लाखांचा चेक देण्यासाठी ७० हजार रुपयांची मागणी सरपंच पती असलेल्या गणेश पाटील यांनी केली. ४० हजार रुपयांवर याची तडजोड झाली. ती ४० हजाराची रक्कम स्वीकारताना महिला सरपंचाचा मुलगा शुभम पाटील आणि सेतूचे संचालक समाधान पाटील यांना लाज लुचपत पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी सरपंच जिजाबाई पाटील, सरपंच पती गणेश पाटील, सरपंचांचा मुलगा शुभम पाटील आणि सेतू केंद्र चालक समाधान पाटील या चार जणांना अटक करण्यात आली आहे.

राजकारणात महिलांचा सहभाग वाढला तर राजकारणातील भ्रष्टाचाराला आळा बसेल, या मागच्या संकल्पनेला पुरुषांनीच हरताळ फासला आहे. त्यामुळे निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढला तर राजकारणात सुधारणा होईल, हे साप चुकीचे ठरत आहे. ज्या महिलांच्या बाबतीत स्वच्छ प्रतिमा होती त्याला पुरुष संस्कृतीने हरताळ फासला आहे. मेहु गावच्या महिला सरपंच जिजाबाई पाटील सरपंच म्हणून या लाच प्रकरणी जबाबदार असल्या तरी त्यांना प्रोत्साहित करणारे त्यांचे पती गणेश सुपडू पाटील हे खरे प्रमुख आरोपी आहेत. त्यांच्यावर महिला सरपंचापेक्षा कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

सरपंच पती गणेश पाटील यांनी आपला मुलगा शुभम पाटील याला लाच प्रकरणात समाविष्ट करून त्याचे चरित्र बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. गणेश पाटील आपल्या मुलाला स्वच्छ राजकारणाचे धडे देण्याऐवजी राजकारणात भ्रष्टाचार करून पैसे मिळवण्याचे धडे देतात म्हणून गणेश पाटील यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करून त्यांना योग्य ती स्वतः दिली पाहिजे. तीन वेळा मत्साजोग गावचे सरपंच म्हणून निवडून आलेले कै. संतोष देशमुख यांचे ७ ते ८ पत्र्याचे घर असू शकते आणि पहिल्याच वर्षात सरपंच असताना ४० हजार रुपये एका प्रकरणात कमाविणाऱ्या सरपंच जिजाबाई लगेच बंगला बांधू शकतात. त्यामुळे राजकारणात कै. सरपंच संतोष देशमुख सारखे शुद्ध प्रतिमेचे सरपंच गावाला लाभणे विराळेच…!

Leave A Reply

Your email address will not be published.