25 हजारांची लाच घेणारा अधिकारी जाळ्यात
भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील घटना, जळगावात पुणे सीबीआयची मोठी कारवाई
जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
जळगावातील भविष्य निर्वाह निधी कार्यालयात पुणे सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. मुख्य वित्त व लेखाधिकाऱ्याला 25 हजारांची लाच घेताना पुणे सीबीआयने रंगेहाथ अटक केलीय.
रमण वामन पवार (58, शनिपेठ, जळगाव) असे लाच घेणाऱ्या मुख्य वित्त व लेखाधिकाऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या वडिलांच्या नावाने कामगार पुरवठा करणारी फर्म आहे. ती दोन वर्षांपासून बंद स्थितीत आहे. या फर्मचे लेखापरीक्षण करण्यासंदर्भात पीएफ कार्यालयाकडून माळी यांना नोटीस बजावण्यात आली. लेखा परीक्षण करण्यात आले मात्र अहवाल देण्यात आला नाही. विचारणा केल्यानंतर पवारांनी त्यात त्रृटी काढल्या. फर्मच्या पीएफ थकबाकीच्या सेटलमेंटसाठी 50 हजारांची लाच मागून 25 हजारांवर तडजोड ठरली.
दरम्यान तक्रारदार यांनी पुण्यात सीबीआयकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यानंतर जळगाव येथे रमण पवार यांना तक्रारदार यांच्याकडून २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या कारवाईबाबत गोपनीयता बाळगण्यात आली होती.
पवार यांना बुधवारी न्यायालयाने 19 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पवार हे नाशिक येथील अंबड, लिंकरोड येथे वास्तव्यास आहेत तर जळगाव येथील शनिपेठ भागात ते भाडेतत्त्वावर राहतात.