दुर्देवी.. बारावीचा पेपर देण्यापूर्वीच मृत्यूने गाठले !
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू, कुटुंबीयांचा मोठा आक्रोश
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
बारावीची परीक्षा आजपासून सुरु झाली असून परीक्षेपूर्वीच तरुणाला मृत्यूने गाठले आहे. उमाळ्याकडून जळगाव शहरात येताना तरुणांच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. बारावीच्या परीक्षेसाठी शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात बैठक व्यवस्था पाहण्यासाठी दोघे मित्र जळगावात येत असताना हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव- संभाजीनगर महामार्गावर झालेल्या अपघातात उमाळा येथील मोहित संजय मोरे (वय २०) याचा मृत्यू झाला आहे. तर गौरव अशोक पाटील (वय १८) हा गंभीर जखमी झाला आहे. मोहित मोरे हा तरुण जामनेर येथील फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तर गावातीलच गौरव पाटील याची बारावीची परीक्षा सुरू होत आहे. नूतन मराठा महाविद्यालयात त्याचा पेपर होता. बैठक व्यवस्था पाहण्यासाठी गौरवने मोहीतला सेाबत घेतले.
दरम्यान दोघेही मित्र दुचाकीने जळगाव शहरात येत असताना एमआयडीसी परिसरातील आर. एल. चौकाच्या पुढे मालवाहू वाहन भरधाव वेगात मुख्य रस्त्यावर आल्याने उमाळ्याकडून येणाऱ्या दोघांची दुचाकीसोबत धडक झाली. या अपघातात दोघे तरुण गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिक आणि इतर वाहनधारकांनी जखमींना उचलून रुग्णालयात हलविले. मात्र उपचार सुरू असताना मोहीत याचा मृत्यू झाला. तर जखमी गौरव पाटील याच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दुचाकीला धडक देणारे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणी सुरवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर जखमी मोहीत मोरे याचा मृत्यू झाल्याची घटना उमाळा गावात कळताच ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली मोहीत हा एकुलता मुलगा असल्याने कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला.