शहरातील महामार्गावर अपघात मालिका थांबता थांबेना..!

0

लोकशाही संपादकीय लेख 

जळगाव शहरातून जाणारा महामार्ग हा मृत्यू मार्ग बनला आहे. खोटेनगर ते तरसोद फाटा या दहा किलोमीटर अंतरावर वारंवार अपघात होतात. खोटे नगर ते कालिंका माता मंदिर चौकापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण झाले असले, तरी ते चुकीच्या पद्धतीने झाले असल्याने चौपदरीकरण झाल्यावर अपघात थांबतील असे वाटले होते. तथापि शिव कॉलनी जवळील क्रॉसिंग, आकाशवाणी रोटरी सर्कल, तसेच इच्छा देवी आणि अजिंठा चौक येथील चुकीच्या पद्धतीचे रोटरी सर्कल बनवले गेल्यामुळे हे सर्व वाहतुकीसाठी सुरक्षित बनण्याऐवजी अपघाताचे सेंटर बनले आहे. आता पाळधी ते तरसोद महामार्ग बायपास झाला की अपघात थांबतील असा अंदाज वर्तविला जातोय परंतु बायपास झाल्यावरही शहरातील महामार्गावरील अपघात थांबतील याची शक्यता कमीच आहे. कारण जळगाव शहर झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्याचे ठिकाण असल्याने जिल्ह्यातील ग्रामस्थांचे जळगावला येणे अपरिहार्य आहे. चौपदरी महामार्गाला पर्यायी व्यवस्था म्हणजे दोन्ही बाजूंनी समांतर रस्ते करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु समांतर रस्त्यांवर अतिक्रमणाचा वेढा असल्याने तूर्तास तरी समांतर रस्ते होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे महामार्गावर क्रॉसिंग करणे वाहनधारकांना अत्यंत जिकरीचे झाले आहे. चौकातील रोटी सर्कल डिफेक्टिव्ह बनले गेले आहे.

जिल्हा विकास आणि सनियंत्र समितीची नुकतीच बैठक झाली. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, शहराचे आमदार राजू मामा भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे हे लोकप्रतिनिधी तर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व विविध खात्याचे प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. महामार्गाच्या सोयी सवलती संदर्भात समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी संताप व्यक्त केला. मंत्री संजय सावकारे आणि महामार्गाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. महामार्गावरील खड्डे बुजवले जात नसतील आणि त्यामुळेच महामार्गावर अपघात होत असतील तर टोलच भरले जाणार नाही, असा सज्जड दम सत्ताधारी मंत्र्यांनी दिला. ती बैठक पार पडते न पडते तोच पुन्हा महामार्गावर शिव कॉलनी उड्डाणपुलाजवळ गुरुवारी दुचाकी चालविणाऱ्या वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले. वृद्ध जागीच ठार झाला आणि अज्ञात वाहन पसार झाले. किड्या मुंग्यांसारखे लोक चिरडले जात आहेत. या अपघाताला आता जबाबदार कोण? महापालिकेत आता प्रशासकीय राजवट आहे. नगरपालिका प्रशासनाचा कुणी वाली आहे की नाही? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

महापालिका प्रशासन कर्तव्यदक्ष असते तर समांतर रस्त्यावरील अतिक्रमणे युद्ध पातळीवर काढून महामार्गावर होणाऱ्या अपघातातील लोकांचे प्राण वाचले असते, पण ते होत नाही. महापालिकाच्या निवडणुका तोंडावर आहेत. तेव्हा लोकप्रतिनिधी निवडणुकीत मतदानाला काय उत्तर देतील हे काळच ठरवेल..!

जिल्ह्यात महाराष्ट्र विधानसभेतील तीन कॅबिनेट मंत्री आणि केंद्रातील एक राज्यमंत्री जळगाव जिल्ह्याला लाभले आहेत. सर्व मंत्री आणि लोकप्रतिनिधी आमदार अनुभवी आहेत. पण त्यांची संवेदनशीलता गेली कुठे? लोकांच्या प्राणांची त्यांना किंमत वाटत नाही का? ज्यांच्या कुटुंबावर हे संकट कोसळते त्यांनाच त्यांची किंमत कळते. लोकप्रतिनिधींकडून लोकांच्या अपेक्षा आहेत. परंतु त्यांचा अपेक्षाभंग होत आहेत. पाळधी ते तरसोद महामार्गाचे बायपास अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून येते. आता ३१ मार्चच्या आत पाळधी ते तरसोद बायपास वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे सांगण्यात येते. आतापर्यंत अनेक वेळा सहा सहा महिन्यांचे आश्वासन देण्यात ,आले परंतु ते आश्वासन पूर्ण झालेले नाही. ही कसली कामाची पद्धत म्हणावी? अधिकारी किंवा कंत्राटदार ऐकत नाहीत का? ते न ऐकण्याचे कारण काय? हे सर्व पाहता अधिकारी कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधी यांच्यात साठे लोटे आहे का? अशी संशयाची पाल चुकचुकते..!

Leave A Reply

Your email address will not be published.