जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरूच आहे. जळगाव शहरातील जुना निमखेडी रोडवर एका अज्ञात वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षातील ज्ञानेश्वर झगडू शिवदे आणि प्रमोद झगडू शिवदे या दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे शिवदे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

ज्ञानेश्वर शिवदे हे शिवसेनेच्या शहरप्रमुख ज्योती शिवदे यांचे पती आहेत. तर प्रमोद शिवदे हे त्यांचे दीर आहेत. त्यांच्या कुटुंबाचा पाणीपुरीचा व्यवसाय आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आणि माल घेण्यासाठी हे दोन्ही भाऊ पहाटे चार वाजता रिक्षाने जात होते. त्यावेळी हा अपघात घडला. या रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, महानगराध्यक्ष आणि महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुखांनी घटनास्थळी धाव घेतली. कुटुंबातील दोन्ही कर्ते पुरुष गमावल्याने शिवसेनेच्या शहरप्रमुख ज्योती शिवदे यांनी प्रचंड आक्रोश केला. याप्रकरणी अपघाताला कारणीभूत असलेल्या चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


