जळगावात रास्ता रोको आंदोलन; मुख्य कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या महाराष्ट्रात महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य केले जात असल्याने जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट उठली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बेताल वक्तव्य करून बदनामी करण्याचे षडयंत्र करणाऱ्या राज्यकर्ते व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात जळगावात आंदोलन करण्यात आले.

जळगाव शहरातील विविध पुरोगामी संघटनांनी आज सकाळी बांभोरीसह महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत शासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यामुळे महार्गावरील वाहतूक सुमारे दहा मिनिटे ठप्प झाली. यावेळी शंभराहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी तात्काळ या आंदोलकांना ताब्यात घेत बाजूला नेत वाहतूक सुरू केली. मात्र काहीवेळाने पुन्हा आंदोलक रस्त्यावर आले, यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत तालुका पोलिस ठाण्यात नेण्यात आले. लोकसंघर्ष मोर्चा, बहुजन जनक्रांती मोर्चा, जिजाऊ ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा, छावा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस, अखिल भारतीय पारधी महासंघ, भारत मुक्ती मोर्चा, रिपब्लीकन पॅथरसह अन्य संघटनांचा यात सहभाग होता.

लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, बहुजन जनक्रांती मोर्चाचे मुकूंद सपकाळे यांना रास्ता रोको करण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले. शिंदे हे शिवरामनगरातील निवासस्थानापासून वाहनातून बसून घरून निघत असतानाच त्यांचे वाहन अडविण्यात आले.  तासभराने त्यांना रामानंद पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या ठिकाणी कार्यकर्त्यांची चांगलीच गर्दी जमा झाल्याने दोन्ही नेत्यांना अटक करून कार्यकर्त्यांना पोलिस ठाण्याबाहेर काढण्यात आले. यावेळी प्रतिभा शिरसाट, दिलीप सपकाळे, अमोल कोल्हे, निवेदिता ताढे, मंगला पाटील, सचिन सोमवंशी आदी उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.