हवामानात बदल: जळगाव शहरासह जिल्ह्यात सर्दी-खोकला आणि तापाचे रुग्ण वाढले
जळगाव: जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यापासून जाणवणारी थंडी अचानक कमी झाल्याने बदलत्या हवामानाचा प्रतिकूल परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. मागील तीन दिवसांत तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने वातावरणात सतत चढ-उतार होत आहेत. या बदलामुळे जिल्ह्यात सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी व घशात खवखवण्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली असून, सरकारी व खासगी रुग्णालयांच्या ओपीडीत रुग्णसंख्या सरासरी ४० टक्क्यांनी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्ह्याचे किमान तापमान २७.५ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते, मात्र सध्या त्यात वाढ होऊन ते सुमारे ३२ अंशांपर्यंत पोहोचले आहे. या अचानक झालेल्या बदलामुळे नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असून संसर्गजन्य आजार बळावत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. सध्या जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी), पालिकेची रुग्णालये तसेच जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये आणि खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी होत आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, विशेषतः ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांमध्ये या आजारांचे प्रमाण अधिक आहे. लहान मुलांची प्रतिकारशक्ती तुलनेने कमी असल्याने त्यांना या हवामान बदलाचा संसर्ग लवकर होत आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे, योग्य व वेळेवर उपचार घेतल्यास बहुतांश रुग्णांना तीन ते चार दिवसांत आराम मिळत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. नागरिकांनी बदलत्या हवामानानुसार आरोग्याची काळजी घ्यावी आणि आजाराची लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.