रिक्षा प्रवासात वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोती लंपास

0

रिक्षा प्रवासात वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोती लंपास

रेल्वे स्टेशन ते बस स्टँडदरम्यान प्रकार; दोन अज्ञात महिला चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात भरदिवसा हातचलाखीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रिक्षाने प्रवास करत असताना दोन अज्ञात महिला चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची दोन पोती लंपास केल्याची घटना ६ डिसेंबर रोजी घडली. या चोरीत सुमारे ९८ हजार रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी पळवून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शनिवारी (दि. १३) जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रभावती चुडामन वडीलकर (वय ५९, रा. न्यू पार्वती काळे नगर, जळगाव) या दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्टेशनबाहेरून बस स्टँडकडे जाण्यासाठी रिक्षा (क्र. एमएच १९-सीडब्ल्यू-३७७१) मध्ये बसल्या होत्या. त्याच रिक्षात दोन अज्ञात महिला प्रवासीही होत्या.

रिक्षा बस स्टँड परिसरात पोहोचल्यानंतर त्या दोन्ही महिला खाली उतरून निघून गेल्या. काही वेळाने घरी पोहोचल्यावर वडीलकर यांच्या लक्षात आले की त्यांच्या गळ्यातील सोन्याची दोन पोती गायब आहेत. चोरीस गेलेल्या दागिन्यांची किंमत अंदाजे ९८ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादीच्या नकळत व संमतीशिवाय लबाडीने ही चोरी केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून, या घटनेमुळे शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी अज्ञात महिला चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार सतीश पाटील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.