अक्सानगरात विजेच्या धक्क्याने बाप-लेक ठार, भाची गंभीर
संतोषी माता मंदिर रस्त्यावर हृदयद्रावक घटना
जळगाव प्रतिनिधी शहरातील अक्सानगर परिसरात संतोषी माता मंदिर रस्त्यावर आज शुक्रवारी सकाळी अंदाजे १०.३० वाजता घडलेल्या भीषण दुर्घटनेने परिसरात खळबळ उडाली. घराच्या गच्चीवर कपडे वाळत घालताना उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने मामेबहिणीपैकी एक मुलगी गंभीर भाजली. तिला वाचवण्यासाठी धावलेल्या बाप-लेकाला विद्युतप्रवाहाचा जबर धक्का बसून दोघांचा जागीच मृत्यू झाला.
मास्टर कॉलनीजवळील अक्सानगरमध्ये मौलाना साबीर खान नवाज खान (वय ३६) पत्नी, आई-वडील, दोन मुली आणि एका मुलासह राहतात. शुक्रवारी सकाळी मोठी भाची मारिया फातेमाबी (वय १२) गच्चीवर कपडे वाळत घालत असताना जवळून जाणाऱ्या उच्चदाबवाहिनीला चुकून स्पर्श झाला. विजेचा जोराचा शॉक बसल्याने ती खाली कोसळली. हे पाहताच सोबत असलेली मामेबहीण आलिया (वय १६) तिला वाचवण्यासाठी धावली; मात्र तिलाही विजेच्या प्रवाहाने कवेत घेतले.
दोन्ही मुली संकटात असल्याचे पाहून मौलाना साबीर खान वर धावले. मात्र, विद्युतवाहिनीच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्याने तेही प्रचंड प्रवाहाच्या कचाट्यात सापडले. या भीषण विद्युतप्रवाहामुळे मौलाना साबीर खान आणि मुलगी आलिया यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. भाची मारिया फातेमाबी गंभीर जखमी असून तिला तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय येथे नातेवाईक व समाजातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. दुर्दैवी मृत्यूमुळे वातावरण हळहळले होते. दरम्यान, महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून परिसरात संतापाचे वातावरण आहे.